पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म:
११७
 

याचा अर्थ असा की स्वराज्य व स्वधर्म यांचा काही संबंध असतो हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. व्रतेवैकल्ये, तीर्थयात्रा, उपास, गोब्राह्मणपूजन, दानधर्म, पूजा अभिषेक यांचा आचार केला की आपण स्वधर्मांचे पालन केले असे त्यांना वाटत होते. आणि ही श्रद्धा अजूनही हिंदुसमाजात दृढमूल आहे. हिंदुधर्माला व्यक्तिधर्माचे स्वरूप कसे आले होते, हे यावरून स्पष्ट होते. धर्म हा समाजाच्या धारणेसाठी, अभ्युदयासाठी, संघटनेसाठी असतो हा प्राचीन विचारच हळूहळू या भूमीतून नाहीसा झाला आणि या समाजाला संघटनतत्त्वच राहिले नाही. राष्ट्रभावना शक-यवन- हूणांच्या आक्रमणाच्या काळी बऱ्याच प्रमाणात होती. तिचा पुढे लोप झाला. आणि धर्माला व्यक्तिनिष्ठ रूप आले. मोक्ष ही कमालीची व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे. तिला समाजनिष्ठ करण्याचा गीतेतील भागवतधर्माचा प्रयत्न होता. पण टिळकांनी गीतारहस्यात म्हटल्याप्रमाणे, भागवतधर्मही पुढे निवृत्तिप्रधान म्हणजे व्यक्तिनिष्ठ झाला. व्रतेवैकल्ये, उपासतापास, तीर्थयात्रा यांचा तर समाजनिष्ठेशी केव्हाच संबंध नव्हता. यामुळेच स्वराज्य व स्वधर्म यांचा संबंध तुटला व मानसिंग, जयसिंह हे स्वराज्यशत्रू स्वधर्मनिष्ठ ठरू लागले.

ब्रह्मक्षत्र :
 स्वधर्म व स्वराज्य यांचा संगम म्हणजेच प्राचीन काळचा ब्रह्मक्षत्रसंयोग होय. ब्राह्मण व क्षत्रिय यांनी जर सहकार्य केले तर, अग्नी वने जाळतो, तसे ते शत्रूला जाळून टाकतील, (वन, १८५, २५) ब्राह्मण क्षत्रियाचे सामर्थ्य वाढवितो व क्षत्रियामुळे ब्राह्मणाचा उत्कर्ष होतो, (शांति, ७३, ३२) अशा तऱ्हेची अनेक वचने महाभारतात आहेत. समाजाच्या उत्कर्षासाठी स्वधर्म व स्वराज्य यांची सांगड अविभाज्य असली पाहिजे, असाच त्यांचा अर्थ आहे. धर्माचा विचार करतानाही, राजधर्मात सर्व धर्म समाविष्ट होतात, असा पितामह भीष्मांचा अभिप्राय होता. ते म्हणतात, 'ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्मांचा अंतर्भाव होतो.' (शांति, ६३, २५) राजधर्मविहीन व्रतेवैकल्ये, उपासतापास, तीर्थयात्रा यांना प्राचीन ऋषी धर्म म्हणण्यास सिद्धच नव्हते. याचाच अर्वाचीन भाषेत अर्थ असा की जो स्वातंत्र्यद्रोही असतो तो स्वधर्मनिष्ठ