पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

एकछत्रात आणणारा सम्राट राजस्थानात केव्हाच झाला नाही !
 अंध मानापमानाच्या भावनांमुळे, कुलश्रेष्ठतेच्या विपरीत कल्पनेमुळे रजपूत हे राष्ट्रसंघटना वा साम्राज्य संघटना करू शकले नाहीत. त्या सर्वांना धर्माभिमान होता. पण आपला कुलाभिमान धर्मसंघटनेत विलीन करण्यास त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे शेवटी प्रत्येक कुलाला आपल्या मुली मोगलांना द्याव्या लागल्या व मोगलांचे दास व्हावे लागले आणि तो धर्माभिमान निष्फल ठरला. म्हणजे कुलाभिमानही गेला व धर्माभिमानही गेला !

स्वराज्य व स्वधर्म :
 पण धर्माभिमान याचा अर्थ आपण स्पष्ट केला पाहिजे. अनेक इतिहासकारांनी जयपूर, जोधपूर या संस्थानांतील राजे भगवानदास, मानसिंह, मिर्झाराजे जयसिंह, जसवंतसिंह, बिकारनेचा रायसिंह, हाडावतीचा रावभोज यांचे, ते सर्व स्वधर्माचे अभिमानी होते, हिंदुधर्मावर त्यांची अपार निष्ठा होती, असे वर्णन केले आहे. यांच्यापैकी बहुतेकांनी आपल्या घराण्यातील कन्या मोगलांस दिल्या होत्या व मोगल साम्राज्याचा विस्तार करण्यात आपले शक्तिसर्वस्व वेचले होते. वर सांगितलेच आहे की, रजपुतांनी राजस्थानाबाहेर राज्यसाम्राज्यविस्तारासाठी कधीच पाऊल टाकले नाही. पण टाकले नाही ते हिंदुराज्यविस्तारासाठी! मुस्लीम साम्राज्यासाठी ते मध्य आशियापासून तंजावरापर्यंत आणि सिंधपासून बंगाल बिहारपर्यंत सेना घेऊन दौडत होते. महाराणा प्रतापसिंह यांचे स्वातंत्र्य- संपादनाचे प्रयत्न यांनीच विफल केले. शिवछत्रपतींवर तो प्रसंग यांनीच आणला होता. मिर्झाराजा जयसिंह म्हणत असे की, दिल्लीचे नशीब माझ्या हाती आहे. मी दिल्लीचे केव्हाही चूर्ण करू शकेन. आणि त्याचे सेनासामर्थ्य व सेना-नायकत्वाचे गुण पाहता, ते अक्षरशः खरे होते असे दिसते. त्याच्याजवळ बावीस हजार रजपूत घोडेस्वार असत. गझनीच्या महंमदाजवळ पंधरा हजारच घोडेस्वार होते. त्याचा पूर्वज मानसिंह याच्याजवळ वीस हजार कडवी रजपूत सेना होती. पण ती घेऊन तो अकबराच्या सेवेस नेहमी सज्ज असे.
 अंगी सेनानायकाचे विपुल गुण आहेत, प्रचंड सेना हाताशी आहेत, स्वधर्माचा अभिमानही आहे; तरी हे सर्व रजपूत वीर बादशहाच्या सेवेत राहून हिंदुराज्ये बुडविण्याच्या व मुस्लीम राज्यविस्ताराच्या उद्योगात गुंतलेले असत.