पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
११५
 

राज्ये स्वतंत्र होती. प्रसंगी ती मेवाडच्या नेतृत्वाखाली एक होत असली तरी त्यांच्या आपसात नित्य लढाया चालू असत. दक्षिणेत विजयनगरच्या नेत्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेच्या आंध्र, तामीळनाड, केरळ व कर्नाटक येवढ्या प्रदेशांचे एकछत्री राज्य स्थापून ते २००-२५० वर्षे यशस्वी रीतीने चालविले होते. त्यामुळे तो सर्व भूप्रदेश मुस्लीमांच्या अत्याचारांपासून दीर्घकाळ अबाधित राहिला. रजपुतांनी याच प्रकारे निदान सर्व राजस्थान एकछत्री केले असते तर जयपुर, जोधपूर, इ. संस्थानांचे स्वातंत्र्य, तेथील स्त्रियांचे शील व पावित्र्य यांचे त्यांना रक्षण करता आले असते. इतकेच नव्हे तर सिंध, गुजराथ, माळवा, या प्रदेशांतील मुस्लीम सत्ता नष्ट करून शेवटी दिल्लीच्या सुलतानीलाही शह देता आला असता. महाराणा कुंभ, महाराणा संग, महाराणा प्रतापसिंह यांच्या पराक्रमांचे इतिहास वाचले म्हणजे यात अशक्य काहीच नव्हते असे दिसते. विजयनगरने वर सांगितलेल्या चार प्रदेशांचे स्वातंत्र्य व शील रक्षिले आणि मधून मधून विजापूर, नगर, गोवळकोंडा यांवरही आक्रमण करून ती राज्ये खिळखिळी करून टाकली. हे सर्व यश एकछत्री सत्तेचे आहे. रजपुतांना हे जमले नाही. यात त्यांना यश आले नाही. ते का आले नाही?
 प्रसिद्ध इतिहासकार ईश्वरी प्रसाद यांनी रजपुतांच्या शौर्याचे व त्यांच्या उणीवांचेही वर्णन केले आहे. "रजपूत जन्मतःच लढवय्या असे. शरणागतीपेक्षा प्राणदान त्याला श्रेयस्कर वाटे. पण त्याचे हे शौर्य, हे बल संघटित होणे दुरापास्त होते. कारण त्यांच्यात भिन्न भिन्न जमाती व कुले असून प्रत्येक जमातीला आपल्या वांशिक थोरवीचा अतिरिक्त अभिमान असे. या जमातीत नित्यस्पर्धा व कलह चालत व त्यांमुळे रजपुतांचे ऐक्य दुष्कर होऊन बसले होते. शिवाय तेथे जातिभेदाची भावना पराकाष्ठेची तीव्र होती. त्यामुळे खालच्या जातीतील पुरुष थोर पदाला चढणे अशक्य होते. अर्थातच खालच्या जातीतील लोकांच्या कर्तृत्वाला समाज मुकत असे. जाती व कुल यांच्या अंध अभिमानामुळे गुण व कार्यक्षमता यांची फार हानी होऊन मुस्लीमांचा पहिला तडाखा बसताच; सर्व राजपुती भारत पायासकट हादरला." –(मिडीव्हल इंडिया, पृ. १३२) पुस्तकाच्या प्रस्तावनेतही त्यांनी हेच विचार मांडले आहेत. मानापमानाच्या कल्पनांमुळे रजपूत आंधळे झाले होते. त्यामुळे विघटना हेच त्यांचे लक्षण होऊन बसले. रजपूत एवढे महापराक्रमी पण सर्व रजपूत जमाती व लोक दृढपणे