पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

अखेरपर्यंत टिकवून मेवाडच्या शूर रजपुतांनी आपले स्वातंत्र्य अबाधित राखले. इ. स. १३०३ मध्ये अल्लाउद्दिन याने चितोडवर स्वारी केली. त्या वेळी राणा रत्नसिंह व लक्ष्मणसिंह यांनी प्रतिकाराची पराकाष्ठा केली. पण रणांगणात ते मारले गेले व पद्मिनीसह रजपूत स्त्रियांनी जोहार केला. त्यानंतर चितोड सर्व जाळून टाकून सुलतानाने मेवाडचे राज्य नष्ट करून टाकले. पण लवकरच चक्रवर्ती हम्मीर याचा उदय झाला व त्याने मेवाडच्या गदीची पुन्हा प्रस्थापना केली. त्यानंतर क्षेत्रसिंह, मोकल, कुंभ व महाराणा संग यांसारखे भीम- पराक्रमी पुरुष चितोडच्या गादीवर आले व आपल्या शौर्यधैर्याने त्यांनी स्वधर्माचे व स्वातंत्र्याचे रक्षण केले. गुजराथ, माळवा येथील सुलतान या वेळी स्वतंत्र झाले होते. त्यांच्याशी या राजांच्या नित्य लढाया चालत. कधी ते एक होऊनही चितोडवर हल्ला करीत. पण तरीही चितोड अभंग राहिले. पण यानंतर बाबराचा उदय झाला. त्याने सर्व मुस्लीम सामर्थ्याची संघटना केली. त्या वेळी रजपुतांचे बल असे संघटित होऊ शकले नाही आणि महाराणा संग याचा खानवाच्या (फत्तेपूर शिक्री) लढाईत पराभव होऊन मेवाडचे स्वातंत्र्य संपुष्टात आले.
 बाप्पारावळापासून राणा संगापर्यंत जवळ जवळ आठशे वर्षे मुस्लीम आक्रमणाचा जो राजपुतांनी प्रतिकार केला त्यासाठी भारतवर्ष त्यांचा कायमचा ऋणी राहील. रजपुतांचे हे कार्य इतके असामान्य आहे की, भारताच्या इतिहासात त्याची स्मृती अमर होऊन राहील यात शंका नाही. बाप्पारावळ व खुम्मण यांनी आपल्या शौर्याचे पहाड मध्ये उभे केले नसते तर आठव्या नवव्या शतकात अरबांच्या आक्रमणाची लाट सर्व उत्तर हिंदुस्थानात पसरली असती. त्या घोर आपत्तीतून भारताला वाचविण्याचे श्रेय सर्वस्वी रजपुतांचेच आहे.
 रजपुतांच्या श्रेयाचा असा विचार केल्यानंतर त्याच्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे. आणि हिंदुसमाजाच्या संघटनक्षमतेविषयी यावरून काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

एकछत्र नाही :
 भारतातील हिंदुबलाच्या संघटनेचा विचार करू लागताच पहिली गोष्ट ध्यानात येते ती ही की, रजपुतांना अखिल राजस्थानचे एकछत्री राज्य करणे कधीही शक्य झाले नाही ! मेवाड, जयपूर, जोधपूर, अजमीर, बिकानेर इत्यादी रजपूत