पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
११३
 

अकराव्या आणि बाराव्या शतकात भारतात जी अनेक हिंदू राज्ये होती त्यांतल्या एकानेही अशी आसेतुहिमाचल भरारी का मारली नाही ? मनात शल्य असे उभे राहते की अनेक रजपूत सरदारांनी राजा भगवानदास, मानसिंग, मिर्झाराजे जयसिंग, जसवंतसिंग यांनी— मुस्लीमांच्या साम्राज्याच्या प्रसारासाठी अखिल भारतभर आणि मध्य आशियापर्यंतही दिग्विजय केले. पण हम्मीर, कुंभराणा संगराणा यांनी हिंदूंचे साम्राज्य वाढविण्यासाठी राजस्थानबाहेर कधीच पाऊल टाकले नाही ! या घटनांची संगती कशी लावावयाची ?
 रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी मुस्लीम आक्रमणाच्या प्रतिकारार्थ जे प्रयत्न केले त्यांचा इतिहास पाहून त्याची थोडी मीमांसा आपल्याला करावयाची आहे. तसे करताना वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू.

रजपूत :
 आठव्या शतकात सिंधवर अरबांनी आक्रमण केले. तो प्रांत त्या वेळी अतिशय थोडक्या अवधीत बळी पडला. तेव्हा तेथून पुढे सरकून कासीमने मुलतानही घेतले. अरबांनी पश्चिमेस जिब्राल्टर, स्पेनपर्यंत विजय मिळविले होते. तसेच विजय हिंदुस्थानातही मिळविण्याची त्यांची आकांक्षा होती. त्यामुळे सिंधमधून ते राजस्थानवर आक्रमण करू पहात होते. पण बाप्पारावळ हा एक थोर पुरुष या वेळी उदयास आला व त्याने मेवाडमध्ये चितोडास राज्यस्थापना करून अरबांच्या आक्रमणास पायबंद घातला. पुढल्या शतकात खलिफा अलमामूनच्या सैन्याला मेवाडचा राजा दुसरा खुम्माण याने अनेकवेळा खडे चारल्याचे मागे सांगितलेच आहे. असे प्रचंड तडाखे बसल्यामुळे अरबांनी राजस्थानवर फिरून आक्रमण केले नाही. अकराव्या शतकात महंमद गझनीच्या स्वाऱ्या भारतावर झाल्या. पण तो राजस्थानात कधी शिरला नाही. त्यामुळे मेवाडशी त्याचा सामना झाला नाही. तेराव्या शतकात शिहाबुद्दिन घोरीने दिल्लीला राज्य प्रस्थापित केले आणि उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक राज्ये त्याने व पुढील सुलतानांनी नष्ट केली. पण त्या वेळीही मेवाडवर त्यांची मात्रा चालली नाही. शमसुद्दिन अल्तमश याने मेवाडवर स्वारी केली होती. पण त्या वेळचा राजा जैत्रसिंह याने त्याचा पुरा मोड केला. हीच परंपरा तेराव्या शतकाच्या