पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

झुगारावे, असे वाटताच झुरळ उडवून द्यावे, तसे त्याने ते उडवून दिले. आणि बहामनी राज्ये नष्ट करण्यासाठी अनेकवार स्वाऱ्या करूनही तीनशे वर्षे दिल्लीकरांना यश आले नाही. उत्तरेतली व दक्षिणेतली हिंदुराज्ये दिल्लीच्या सुल्तानांनी पाचपंचवीस वर्षांत सहज लीलया बुडविली. काही काही राज्ये त्यांनी एकेका वर्षांत व काही तर दोन-चार महिन्यांत नष्ट केली. जे दक्षिणेतील बहामनी राज्याचे, तेच बंगाल, गुजराथ, माळवा, सिंध येथील मुस्लीम राज्यांचे. दिल्लीच्या सत्तेशी झगडा करून दोनदोनशे वर्षे तेथील सुलतानांनी आपली राज्ये टिकविली होती. याचे कारण हेच की दिल्लीच्या सत्तेतच तसा दम नव्हता. नादान, विलासी सुलतान, सरदारांचे सेनापतींचे हेवेदावे, वर सांगितलेले पंथभेद, वारशाची युद्धे यांनी ती सत्ता नेहमी जर्जर, विकल झालेली असे. पण असे असूनही हिंदूंना तिचे निर्दाळण करता आले नाही. दुदैव असे की त्यांनी अठराव्या शतकापर्यंत तसा प्रयत्नही केला नाही. हे पाहून हिंदूंच्या जीवनशक्तीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन फार बारकाईने विचार केला पाहिजे असे वाटते.

आकांक्षाच मेल्या :
 हा विचार करू लागताच अनेक प्रश्न मनात उभे राहतात. अरबस्तानातून सिंधवर प्रथम आक्रमण आले, आणि त्यानंतर राजस्थानवर अनेक आक्रमणे झाली. ती सर्व रजपुतांनी परतवून लावली. पण प्रश्न असा येतो की, या टोळधाडी कायमच्या नष्ट करण्यासाठी राजपुतांनी अरबस्तानावर का स्वारी केली नाही ? महंमद गझनी, महंमद घोरी यांनी लागोपाठ भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. पण या सत्ता मुळातच उखडून टाकण्याच्या हेतूने हिंदी राजांनी गझनी, कंदाहार, खुरासान या परगण्यांवर का स्वाऱ्या केल्या नाहीत ? ही दिग्विजयी वृत्ती पूर्वी हिंदूंत होती. ती आता समूळ नष्ट का झाली ? तेराव्या शतकाच्या आरंभी मुस्लीम सत्तेचा पाया भारतात घातला गेला. आणि लगेच सर्व भारत जिंकण्याच्या आकांक्षा मुस्लीमांत निर्माण झाल्या. सिंधपासून बंगालपर्यंतचा सर्व उत्तर हिंदुस्थान त्यांनी पंचवीस वर्षात आक्रमिला आणि पुढील शतकात रामेश्वरपर्यंत जाऊन तेथे त्यांनी मशीद उभारली. अशा आकांक्षा प्रांतोप्रांती स्वतंत्र झालेल्या प्रत्येक मुस्लीम सत्तेच्या ठायी होत्या. पण