पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१११
 

महाराष्ट्र येथले सुलतान बहुधा स्वतंत्रच असत. त्यांच्या व दिल्लीच्या सुलतानांच्या नित्य लढाया चालत. त्यांची आपसांतही नित्य युद्धे होत. वारसाच्या लढाया दिल्लीच्या तख्तासाठी होत तशाच या प्रदेशांतही होत असत. अकबरापासून म्हणजे १५६० पासून औरंगजेब अखेर इ. स. १७०७ पर्यंत मुस्लीम साम्राज्यसत्तेला थोडे स्थैर्य होते. त्या वेळीही अखिल भारतावर त्यांचे साम्राज्य नव्हतेच. दक्षिणेत मोगलांची सत्ता कधीच प्रस्थापित झाली नाही. त्यांचे साम्राज्य उत्तरेतच होते. आणि तेहि वारशाची दरपिढीला होणारी युद्धे, अयोध्या, बंगाल येथील सुभेदारांची बंडे यांनी खिळखिळे झालेले, असेच होते. याशिवाय शिया व सुनी असे भेद मुस्लीमांत होतेच आणि ते एकमेकांत घनघोर युद्धे व्हावीत इतके तीव्र होते. वंश दृष्टीने पाहिले तरी त्यांच्यांत अनेक भेदभाव होते. अरब, अफगाण, इराणी, तुर्क, मंगोल, शिद्दी व बाटलेले हिंदी-मुसलमान या वांशिक भेदांना, अनेक वेळा अत्यंत उग्र रूप येऊन एका वंशाने दुसऱ्याच्या कत्तली कराव्या येथपर्यंत अनेक वेळा मजल गेलेली होती. हे सर्व इतिवृत्त ध्यानात घेतले म्हणजे असे म्हणावे लागते की, भारतावरील मुस्लीम आक्रमणाचा इतिहास हा मुस्लीमांच्या कर्तृत्वाचा नसून हिंदूंच्या नादानीचा, अधःपाताचा आहे. हे आक्रमण पाच-सहाशे वर्षांत केव्हाही, कोणत्याही क्षणी हिंदूंना भारी होते असे नाही. मुस्लीमामुस्लीमांत पाहिले तर कोणीही यावे आणि कोठल्याही प्रांतातल्या आणि दिल्लीच्याही सत्तेचा धुरळा करावा अशी स्थिती बहुधा सर्व काळी होती. असे असून हिंदूंना हे पाच सहा शतके साधले नाही, ही गोष्ट अत्यंत उद्वेगजनक वाटते. या समाजाच्या सामर्थ्याला कोठे तरी अत्यंत घातक अशी कीड लागलेली असली पाहिजे, हाच त्याचा अर्थ आहे.

तुलना :
 इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनी याने दक्षिणेत कुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याआधी देवगिरीस यादवांचे राज्य होते. एकदा पराभव होऊन दिल्लीचे मांडलिकत्व नशिबी आल्यावर यादवांनी दिल्लीचे जू झुगारून देण्याचा सारखा प्रयत्न चालविला होता. रामदेवराव, शंकरदेव व हरपाळदेव यांनी यासाठी दोन पिढ्या धडपड चालविली होती. पण त्यांना यश आले. नाही. ते सर्व प्राणास मुकले. उलट हसन गंगू बहामनी याला, दिल्लीचे जू