पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

शास्त्र आहे. त्यांनी मुस्लीम होऊन आपला उत्कर्ष साधावा. मग त्यांच्यापुढे हिंदुराजे, हिंदु शास्त्री व हिंदुधर्मशास्त्रही नमेल. पण हिंदू असताना उत्कर्ष साधण्याची संधी त्यांना मिळणार नाही ! असल्या अधम, हीन धर्मशास्त्रामुळे समाजाचा नाश न झाला तरच नवल !
 अल्लाउद्दिनाने १२९७ साली गुजराथ प्रांत जिंकला. ऐबकने तो जिंकल्यावर लगेच पुन्हा तो स्वतंत्र झाला होता. आता मात्र त्याला दीर्घ काल पारतंत्र्य आले. १३०३ साली अल्लाउद्दिनाने चितोडचा विध्वंस केला. त्या वेळी राणी पद्मिनीसह १५००० रजपूत स्त्रियांनी जोहार केला. १३२० पर्यंत मलिक काफूरने दक्षिणची सर्व राज्ये बुडविली. आणि १६३९ साली शहा मीर या मुसलमान सरदाराने काश्मीरचे हिंदुराज्य बुडविले. अशा रीतीने सिंध, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, गुजराथ, माळवा, मेवाड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगण, केरळ, अशा सर्व हिंदुराज्यांचा मुसलमानांनी विध्वंस केला व तेथे मुस्लीम सत्ता स्थापन केली. या सत्तेचा काहीच प्रतिकार झाला नसता तर इजिप्त, इराण, जावा, सुमात्रा यांप्रमाणेच आज हिंदुस्थान सर्वच्या सर्व इस्लामधर्मी झाला असता. पण तसा तो झाला नाही. याचे कारण, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र व पंजाब या राष्ट्रांनी नष्ट झालेली हिंदूंची जीवनशक्ती पुन्हा जिवंत केली व आक्रमणाचा प्रतिकार करून शेवटी भारतातून मुस्लीम सत्तेची पाळेमुळे खणून काढली, हेच होय.

मुस्लीमांचे सामर्थ्य :
 या चार प्रदेशांत हिंदूंनी जे पुनरुत्थान केले ते कोणत्या मार्गाने केले ते आता पहावयाचे आहे. पण ते पहात असताना आपण मुस्लीमांचे सामर्थ्य काय होते ते पाहिले पाहिजे. कारण या सामर्थ्याचा नाश करूनच हिंदूंना हे पुनरुत्थान साधावयाचे होते. एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की अखिल भारतावर मुस्लीमांचे एकछत्री साम्राज्य असे कधीही नव्हते. अल्लाउद्दिन खिलजी व महंमद तघलख यांच्या काळी सर्व मिळून दहा-पाच वर्षेच काय ते असे साम्राज्य असले तर असेल. बाकी प्रारंभापासून अकबरच्या उद्यापर्यंत मुस्लीम साम्राज्यसत्ता अशी भारतात केव्हाही नव्हती. मुस्लीमांनी भारतातील सर्व प्रवेश जिंकले हे खरें पण सिंध, काश्मीर, बंगाल, बिहार, गुजराथ,