पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

नव्हते. 'धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षितः ।' हे वचन प्रसिद्ध आहे. मूर्ती, मंदिरे हा हिंदूंचा धर्म. त्याचे रक्षण करण्यास हिंदू असमर्थ ठरले. तो हत झाला व त्यामुळेच हिंदूंचा नाश झाला. काशीला हिंदूंनी प्रतिकारही केला नाही !

पडण्यास योग्य :
 दिल्ली, अजमीर, कनोज, काशी यांचा उच्छेद झाल्यावर मुस्लीम सत्तेचा पाया हिंदुस्थानात घातला गेला आणि पुढच्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षांत सर्व उत्तर हिंदुस्थान स्वातंत्र्याला मुकला. चिं. वि. वैद्य लिहितात, 'पुढील पंचवीस वर्षांत उत्तर हिंदुस्थानातील राजघराणी आश्चर्यकारक झपाट्याने पडली. पण यात आश्रर्य काय ? उत्तर हिंदुस्थान या वेळी पडण्यासच योग्य झाले होते.' इतर राज्ये जिंकण्याचे काम शिहाबुद्दिनच्या कुतुबुद्दिन ऐबक व शमसुद्दिन अल्तमश या सेनापतींनी केले. हे दोघेही प्रथम गुलाम होते. पण अंगच्या गुणांनी सेनापती आणि सुलतान झाले. शिहाबुद्दिन याने कुतुबुद्दिन ऐबक यास आपली कन्या देऊन जावईही केले. ऐबकने याचप्रमाणे अल्तमशला आपला जावई केले. गुलामी त्यांच्या उत्कर्षाच्या आड आली नाही. या काळात हिंदुसमाजात हे कधीही घडले नसते. कारण येथले लोक चातुर्वर्ण्याचे अभिमानी होते ! १९९७ साली कुतुबुद्दिन याने गुजराथवर स्वारी केली. अबूच्या पायथ्याशी एका घाटावर हिंदू सेना खडी होती. मुस्लीमांनी जरा भ्यालेसे दाखवून माघार घेतली व नित्याप्रमाणे हिंदू फसून पुढे आल्यावर ते उलटले. लढाई होऊन वीस हजार हिंदू मारले गेले. नंतर एकदोन वर्षांत मुस्लीमांनी पाटण व अनहिलवाड जिंकून गुजराथचा विध्वंस केला (११९९). इ. स. १२०२ साली ऐबकने कलिंजरचा विख्यात किल्ला घेतला. तेथली देवळे पाहून त्यांच्या मशिदी केल्या आणि पन्नास हजार लोक गुलाम म्हणून नेले. त्याच साली बखत्यार खिलजी या सरदाराने बंगाल व बिहार हे प्रांत जिंकले, विक्रमशील या विद्यापीठाची राखरांगोळी केली, तेथले सर्व बौद्ध ग्रंथ जाळून टाकले व हजारो बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. कुतुबुद्दीनने यासाठी त्याचा मोठा सन्मान केला. कुतुबुद्दिनानंतर अल्तमश सुलतान झाला. त्याने रणथंबोर व ग्वाल्हेर हे किल्ले घेतले. त्या वेळी ग्वाल्हेरमधील स्त्रियांनी जोहार केला ! इ. स. १२३४ साली अल्तमशने विदिशेवर स्वारी