पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१०७
 

देशांतल्या घडामोडींचे ज्ञान मिळविणे हे जीवनशक्तीचे दुसरे लक्षण होय. पण परदेशगमनाचा निषेध, म्लेच्छ सहवासाचा निषेध, ही हिंदूंच्या धर्मशास्त्रातली लाडकी कलमे त्याच्या आड आली. आणि महंमद घोरीची आक्रमणे ११७६ साली म्हणजे सुमारे दीडशे वर्षांनी सुरू झाली तरी महंमद गझनीच्या वेळेपेक्षा भारतातील राजांच्या मनोवृत्तीत, बेसावधतेत व प्रतिकारशक्तीत कसलाही फरक पडला नव्हता. धर्मशास्त्रकार परिस्थिती पाहून धर्मशास्त्र रचीत नव्हते आणि राजसत्ताधारी डोळसपणे अवलोकन करून अनुभवाने राजनीतिशास्त्र व युद्धशास्त्र संवर्धित करीत नव्हते. महंमद घोरीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. तीन स्वाऱ्यांत त्याचा जय झाला. चवथ्या स्वारीत पृथ्वीराजाने त्याचा निःसंदेह पराभव केला व त्याला जीवदान देऊन सोडून दिले. यानंतर तरी त्याने व रजपूत राजांनी सावध रहावे ! पण उलट पृथ्वीराज विलासात दंग होऊन राहिला व आपल्याच प्रधान सरदारांवर अत्याचार करू लागला. तेव्हा त्याच सरदारांनी शिहाबुद्दिन महंमद घोरीकडे जाऊन त्याला बोलावून आणले. तरीही ठाणेश्वरच्या लढाईत अनेक रजपूत राजे व सरदार घोरीशी सामना करण्यास एकत्र झाले होते. मधल्या काळात मुस्लीमांचे युद्धशास्त्र, त्यांची कपटनीती, त्यांचा धार्मिक कडवेपणा हे सर्व जाणून त्यांवर मात करण्याची सिद्धता हिंदूंनी केली असती तर अजूनही जय मिळाला असता. पण दीडशे वर्षांपूर्वी महंमद गझनीशी लढताना हिंदूंची जी युद्धनीती होती तीच याही वेळी होती. अर्थातच रजपुतांची वाताहत झाली आणि भारताचे भवितव्य ठरून गेले. यानंतर घोरीने पाचची स्वारी करून कनोज घेतले. तोपर्यंत तेथला राजा जयचंद राठोड तमाशा पहात बसला होता. पृथ्वीराजाशी त्याचे वैर होते, म्हणून तो त्याच्या साह्यार्थ गेला नाही, हे ठीक. पण हेच संकट आपल्यावर येणार हे जाणून त्याने स्वतंत्रपणे तयारी करावयास हवी होती. पण ही बुद्धी व शक्ती हिंदूंत राहिली नव्हती. त्यामुळे कनोज पडले. ते लुटून महंमद लगोलग काशीवर गेला व तेथील सर्व मूर्ती नाहीशा करून त्याने त्यांवर मशिदी उभारल्या व अपरंपार लूट जमा करून नेली. येथून पुढे हिंदूंच्या राजसत्तेबरोबरच त्यांच्या मंदिरांचे, मूर्तीचे व स्त्रियांचे भवितव्य ठरून गेले- परकीय आक्रमणापुढे बळी जाणे ! मुस्लीम राज्याचा पाया आता भारतात घातला गेला होता. ते या तीहींचे कडवे शत्रू होते. आणि या तिहींनाही त्यांचे संरक्षण करण्यास समर्थ असे मित्र कोणी