पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

महंमद घोरी याचा आजा हा हिंदू होता आणि ज्या घोर परगण्यातून तो आला तेथे हिंदूंचीच वसती होती. पण हे प्रांत आपले होते याची स्मृतीही भारताला नाही, इतके ते आपल्याला व आपण त्यांना पारखे झालो आहो. अकराव्या शतकाच्या प्रारंभी महंमद गझनीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. पुढील तीस वर्षांत त्याने सतरा स्वाऱ्या केल्या, पण एकाही स्वारीत त्याचा पराभव झाला नाही. काही ठिकाणी त्याला प्रतिकार झाला, कडवा प्रतिकार झाला, पण काही ठिकाणी तोही झाला नाही. राजे व सेनापती पळूनच गेले. या स्वाऱ्यांत त्याने शेकडो देवळे फोडली, हजारांनी कत्तली केल्या व दशसहस्त्रांनी हिंदूंचे धर्मांतर केले. कत्तलीत बाल, वृद्ध, स्त्रिया यांनाही त्याने वगळले नाही. हजारो स्त्रियांना त्याने दासी करून परदेशांत नेऊन विकले. हिंदूंचा जो जो म्हणून मानबिंदू होता तो त्याने पायपोसाने मोजला. पण तरीही हिंदू त्याचा यशस्वी प्रतिकार करू शकले नाहीत. हिंदूंची जीवनशक्ती किती क्षीण झाली होती हे यावरून दिसून येते. स्वातंत्र्याचे, आपल्या भूमीचे, आपल्या धर्माचे, आपल्या स्त्रियांचे, संसाराचे रक्षण करण्याचे सामर्थ्य हे जीवनशक्तीचे पहिले लक्षण होय. ते शक-यवन- कुशाण- हूण यांच्या आक्रमणांच्या वेळी जसे दिसून आले तसे या वेळी दिसले नाही.

अंध धर्मशास्त्र :
 यानंतर वास्तविक हिंदूंना दीडशे वर्षांचा दीर्घ अवसर मिळाला होता. गझनीचे राज्य महंमदानंतर अगदी विस्कळित, विघटित व दुबळे झाले होते. त्या काळी पंजाब सहज मुक्त करता आला असता; इतकेच नव्हे तर गझनीची सत्ताही बुडविता आली असती. पण त्यासाठी सावधता, साक्षेप यांची आवश्यकता असते. झालेल्या घटनांची कार्यकारणमीमांसा करून तीवरून काही निर्णय करण्याची शक्ती अंगी असावी लागते. आगामी संकटांची आधी जाण ठेवून त्यांच्या प्रतिकाराची सिद्धता करावी लागते. पण हिंदूंनी यातले काहीच केले नाही. बाहेरच्या जगात, भारताच्या सरहद्दीबाहेर काय चालले आहे, आपल्याला निर्दाळून गेलेला शत्रू कोण होता, त्याचे बलाबल कशात आहे, तेथून पुन्हा आक्रमण येण्याची शक्यता कितपत आहे, याची जी विवंचना, ती हिंदूंनी केलीच नाही. सर्व जगाच्या हालचालींचे, निदान सरहद्दीजवळच्या