पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वराज्य आणि स्वधर्म
१०५
 

पंजाब परतंत्र झाला तोही तसाच. तेव्हापासून आजच्या क्षणापर्यंत अखिल भारत, त्याच्या सर्व प्रांतांसह, पूर्ण स्वतंत्र असा केव्हाही झाला नाही. अखिल भरतखंडाला स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन झाले, पारतंत्र्याचा अंधार त्याच्या कोणत्याही भूभागात नाही, असा दिव्य क्षण या हजार-बाराशे वर्षांत एकदाही उगवला नाही. हे दुर्घटित आपण आपल्या समाजाच्या संघटना विघटनेचा विचार करताना नित्य ध्यानी वागविले पाहिजे. या काळात रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी आक्रमणांचा निकराने प्रतिकार करून, त्यांचे बव्हंशी निर्दाळण करून, या भूमीला स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन मधून मधून घडविले. या पुढील प्रकरणात प्रामुख्याने त्यांच्याच कर्तृत्वाची मीमांसा करावयाची आहे. त्यांच्या कर्तृत्वामागे कोणते धर्मशास्त्र होते, समाजधारणेचे कोणते तत्त्व होते, समाजसंघटनेचे काही नवीन तत्त्व त्यांनी शोधिले होते काय, त्यांना यश आले ते कशामुळे आणि शेवटी तेही पारतंत्र्यात बुडाले ते कशामुळे याची चिकित्सा करून हिंदुसमाजाच्या भावी उत्कर्षासाठी काही मार्ग आपल्याला शोधावयाचा आहे; उपाय- चिंतन करावयाचे आहे. पण तसे करताना वर सांगितलेल्या अविवेकी व हीन धर्मशास्त्रामुळे हिंदुसमाज अधःपाताच्या कोणत्या पातळीला गेला होता तेही आपण पाहून ठेविले पाहिजे. त्यावाचून आपल्यावरील भयानक संकटाची कल्पना आपल्याला येणार नाही; आपण ज्या व्याधींनी ग्रस्त झालो आहो त्यांचे स्वरूप नीट आकळणार नाही आणि अंतर्मुख होऊन उपायचिंतन करता येणार नाही. म्हणून प्रथम पारतंत्र्याच्या या प्रदीर्घ घोर अंधःकारयुगाचे स्वरूप आपण पाहू. नंतर या युगात वर निर्देशिलेल्या चार राष्ट्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जे प्रयत्न केले त्यांच्या यशापयशाची चिकित्सा करू आणि मग उपायचिंतन करू.

जीवनशक्ती नाही :
 वर सांगितलेच आहे की आठव्या शतकात सिंध व दहाव्या शतकात पंजाब हे प्रांत हिंदूंच्या हातून गेले ते कायमचे. आजही ते पूर्णपणे आपल्या ताब्यात आलेले नाहीत. आणि पुढे कधी काळी येण्याची आशाही उरलेली नाही. वास्तविक येथे बलुचिस्थान व अफगाणिस्थान यांचाही निर्देश केला पाहिजे. कारण हे दोन्ही प्रांत आठव्या नवव्या शतकापर्यंत हिंदू राजसत्तेखाली होते. तेथील प्रजाही बव्हंशी हिंदू होती. दिल्लीला मुस्लीम सत्ता स्थापन करणारा