पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
१०१
 

त्याने कलिवर्ज्य ठरविली. आणि सर्वात अनर्थकारक म्हणजे त्याने केलेला व हिंदुसमाजाने मूढपणे मानलेला परदेशगमनाचा निषेध हा होय. या आधी दोन हजार वर्षे हिंदु लोक साम्राज्यासाठी, धर्मप्रसारासाठी व व्यापारासाठी सर्व जगभर संचार करीत असत. आता परदेशी गेल्यावर वाटेल त्या लोकांबरोबर अन्नपाणीव्यवहार होईल, मग जात बाटेल आणि मग बहिष्कार पडेल, या भीतीने समाजाला अत्यंत हितकर असा जो विश्वसंचार तो बंद पडला, आणि हिंदुसमाज कूपमंडूक बनला. त्याचे एक जिवंत ज्ञानसाधन नष्ट झाल्यामुळे तो आंधळा झाला आणि मग अज्ञानाने, भीतीने, अविवेकाने जो कोणी जे शास्त्र भकेल त्याला अनुसरू लागला. (कलिवर्ज्य विवेचनासाठी पाहा– हिंदूंच्या अवनतीची मीमांसा- कोकजे, प्रकरण ८ वे; काणे- धर्मशास्त्र, खण्ड ३ रा. पृ ८८५ ते ९६८)

सर्व समाजच ग्रस्त :
 हिंदुसमाजाच्या विघटनेचा हा इतिहास पाहात असताना एक मोठा गंभीर प्रश्न मनात येतो. शास्त्रकारांनी वर वर्णिलेले मूढ, अधोगामी, विघटक शास्त्र सांगितले तरी सर्व समाजाने व त्याच्या इतर धुरीणांनी ते का मानले ? त्या काळात सर्व वर्णांचे राजे भारतात राज्य करीत होते. ह्युएनत्संगाने त्याच्या प्रवासकाळी (इ. स. ७ व्या शतकात) भारतात पाच राजे क्षत्रिय, तीन ब्राह्मण, दोन वैश्य व दोन शूद्र होते, असे लिहून ठेविले आहे. इतर ऐतिहासिक पुराव्यांनीही हे आता सिद्ध झाले आहे. तेव्हा ज्यांना या शास्त्रकारांनी, कारण नसताना केवळ लहरीखातर हीन लेखले त्यांनी या शास्त्राला का धिक्कारिले नाही ? सत्ता त्यांच्या हाती होती. शस्त्रबळ त्यांच्याजवळ होते. आणि प्राचीन काळातील उदार ऋषिमुनींच्या शास्त्राचेही बळ त्यांना आपल्या पाठीशी घेता आले असते. या काळात अनेक क्षत्रिय राजघराणी अत्यंत पराक्रमी होती. त्यांनी तरी या अधोगामी धर्मशास्त्राला किंवा अधर्मशास्त्राला विरोध करावयाचा. पण त्यांनी तसे तर केले नाहीच; उलट ब्राह्मणपूजक, चातुर्वर्ण्य- संरक्षक असे म्हणवून घेण्यातच भूषण मानले. याचा अर्थ असा की त्यांनाही शास्त्रप्रणीत जन्मनिष्ठ उच्चनीचता प्रिय होती, मान्य होती. मनूने ब्राह्मणांप्रमाणेच क्षत्रिय राजांचेही वर्णन केले आहे. इन्द्र, अग्नी, सूर्य, वायू इ. लोकपालांच्या