पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

अंशांनी विधात्याने राजाला घडविलेले असते. त्यामुळे त्याचे सामर्थ्य इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असते. त्याच्या अलौकिक तेजामुळे त्याच्याकडे कोणी पाहू शकत नाही. राजा स्वतः सूर्य आहे, इन्द्र आहे, ती एक महादेवता आहे, म्हणून राजाला तो लहान वयाचा असला तरी, मनुष्य मानून त्याचा कधीही अवमान करू नये, असे मनू म्हणतो. मनूचे हे मत सर्व क्षत्रियांनी स्वीकारलेले आहे. त्यांच्यातही वांशिक उच्चनीचतेच्या कल्पना अत्यंत प्रखर अशा होत्या. तेव्हा त्यांनी त्या अधोगामी शास्त्राला विरोध केला नाही यात नवल असे काहीच नाही. तीच गोष्ट वैश्य व शूद्र सत्ताधाऱ्यांची. भारतवर्षात अमुक एका राज्यात त्या काळी राजांनी अस्पृश्यता नष्ट केली, शूद्रांना वेदाधिकार दिले किंवा शास्त्रवचनांचा धिक्कार करून त्यांना इतरांच्या बरोबरीची प्रतिष्ठा दिली असे घडलेले नाही. या वर्णातले जे राजे झाले त्यांनी आपली प्रतिष्ठा आपल्यापुरतीच ठेविली. विषमतेच्या शास्त्रावर घाव घालून सर्व समाजाला त्याच्या शृंखलांतून मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचेसुद्धा कोठे आढळत नाही. सर्व समाजच जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या विषारी कल्पनांनी ग्रस्त झालेला होता असा याचा अर्थ होतो. यापरते दुर्दैव काय ?
 प्राचीन काळचे समाजधारणेचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान टाकून देऊन हिंदुसमाजाने या काळी दुसऱ्या कोणत्या तरी अधोगामी तत्त्वज्ञानाचा अवलंब केला असला पाहिजे असे तिसऱ्या प्रकरणाच्या प्रारंभी म्हटले होते. ते अधोगामी विघटनेचे तत्त्वज्ञान कोणते याचे येथवर विवेचन केले. हे विषमतेचे तत्त्वज्ञान आहे. आचार विषम, विचार विषम, धर्म विषम, न्याय विषम, सर्व समाजरचनाच विषम ! देशकालपरिस्थिती न पाहता, अंध अशा प्रामाण्यबुद्धीने विवेकहीन, मूढ अशा शास्त्रकारांनी हे तत्त्वज्ञान उपदेशिले आणि तितक्याच आंधळेपणाने व मूढबुद्धीने हिंदुसमाजधुरीणांनी ते स्वीकारले. यामुळे हा समाज छिन्नभिन्न झाला. येथे एकमेकांचा कोणी नाही अशी स्थिती झाली. सर्व समाज मिळून काही साधावयाचे आहे ही भावनाच या भूमीतून नष्ट झाली. 'या उत्तरकाळात हिंदुसमाजापुढे सर्वव्यापी, सर्वसंग्राहक असे ध्येयच राहिले नाही, त्यामुळे आम्हीच आमचे स्वातंत्र्य परकीयांच्या पदरात टाकले' असा सिद्धान्त मांडून तर्कतीर्थ कोकजेशास्त्री यांनी त्याचे फार उत्तम विवरण केले आहे. (हिंदूंच्या अवनतीची मीमांसा- प्रकरण ११ वे.)