पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सोवळेओवळे हाच धर्मं झाला. सर्व समाजाला मिळून काही करावयाचे आहे, साधावयाचे आहे ही भावना या मानवसमूहातून नष्ट झाली.

कलिवर्ज्य :
 विषमता, भेदवृत्ती, दूरीभाव, विघटना यांजी बीजे जरी आपल्या धर्मशास्त्रात प्राचीन काळापासून होती तरी त्यांचा परिपोष इ. स. ९ व्या १० व्या शतकांतील धर्मशास्त्रामुळे विशेष झाला. आणि अकराव्या शतकात रचल्या गेलेल्या कलिवर्ज्य प्रकरणामुळे त्या विषारी रोपट्याचा पूर्ण विषवृक्ष झाला व तेथूनच विषमतेचे विष अंगी भिन्न हिंदुसमाजाचा झपाट्याने अधःपात होऊ लागला. कलिवर्ज्य प्रकरण हे उत्तरकाळाच्या विघातक धर्मशास्त्रांपैकी एक महत्त्वाचे प्रकरण असल्यामुळे त्याची थोडक्यात कल्पना देणे अवश्य आहे. त्यावाचून या विवेचनला सांगता येणार नाही.
 'कलिवर्ज्य' ही स्मृती नाही. अनेक पुराणे व स्मृती यांतील वचने एकत्र करून हे स्मृतिवजा तयार केलेले धर्मशास्त्र आहे. मागील धर्मशास्त्रकारांनी अनेक धर्मनियम सांगितले होते. यांतील कलिवर्ज्याच्या कर्त्याला जे नापसंत होते ते त्याने एकत्र केले व मागल्या थोर शास्त्रकारांनी हे नियम सांगितले असले, तरी ते कलियुगात लागू नाहीत, असे बेधडक सांगून टाकले. वास्तविक कलियुगकल्पनाच मागल्या शास्त्रकारांना मान्य नव्हती. त्यांच्या मनातही ती नव्हती. शिवाय, आमचे शास्त्र आम्ही आमक्या युगासाठी सांगितले आहे, असे त्यांनी कोठेही म्हटलेले नाही. सर्व हिंदुसमाज त्यांना त्रिकालदर्शी मानतो. तसे मानले नाही तर मनुयाज्ञवल्क्यांना आज प्रतिष्ठाच राहणार नाही. तरी या ग्रंथकाराने त्यांची अनेक शासने कलिवर्ज्यात घातली; आणि मागल्या स्मृतिकारांना त्रिकालदर्शी मानणाऱ्या हिंदुसमाजाने व त्या काळच्या शास्त्रकारांनी त्याचे हे कलिवर्ज्य स्वीकारले. हा कलिवर्ज्यकार इतका धीट की, पराशराने केवळ कलियुगासाठीच आपली स्मृती आहे, असे सांगितलेले असताना त्याचीही अनेक वचने त्याने कलिवर्ज्यात ढकलली आहेत. मागील शास्त्रकारांप्रमाणेच पराशरानेही शूद्रासमवेत केलेला अन्नव्यवहार विहित ठरविला आहे, विधवाविवाहास मान्यता दिली आहे. कलिवर्ज्याने ही दोन्ही शासने अविहित ठरविली. पतितांची शुद्धी प्राचीनांना मान्य होती. तीही