पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
९९
 

कैवर्तावर बहिष्कार घातला. त्यांनी अनेक वेळा हिंदूंची करुणा भाकली, पण व्यर्थ. त्यामुळे ते लोक अगतिक होऊन शेवटी मुसलमान झाले. आता ते कडवे मुसलमान बनले आहेत. राजस्थानातील मलकाना रजपुतांची हकीगत अशीच आहे. देश, गोब्राह्मण यासाठी शौर्याने लढणारा हा समाज! एकदा यांच्या गावच्या तळ्यात मुस्लीमांनी गोमांस टाकले अशी अफवा उठली. हिंदू लोक अत्यंत 'पवित्र!' त्यांना हा भ्रष्टाकार कसा सहन होणार ? त्यांनी या सर्व रजपुतांना मुस्लीम धर्मांत लोटून आपल्या पावित्र्याचे रक्षण केले. (संस्कृतिसंगम- पृ. १०३) या पावित्र्य कल्पनेपायीच हिंदुसमाज छिन्नभिन्न झाला, असा सिद्धान्त तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी आपल्या 'हिंदूंच्या अवनतीची मीमांसा' या ग्रंथात मांडला आहे व अनेक प्रमाणे देऊन तो सिद्ध केला आहे. पावित्र्याच्या या कल्पनेने हिंदुसमाजाला जोपर्यंत झपाटले आहे तोपर्यंत त्याची संघटना होणे दुर्घट आहे.
 अशा या विकृत धर्मबुद्धीमुळे या हिंदुसमाजाला संघटनात्त्व असे राहिलेच नाही. राष्ट्रभावना पूर्वी उदित झाली होती हे मागे सांगितले आहे. पण कोणत्याहि समाजपोषक भावनेचा ग्रंथ, प्रवचने, कीर्तने यांनी सतत परिपोष करावा लागतो. तो तर पुढल्या काळात झाला नाहीच. उलट वर सांगितल्याप्रमाणे तिला सुरुंग लावण्यातच उत्तरकाळचे शास्त्रकार धन्यता मानीत होते. धर्म ही समाज- संघटक अशी दुसरी शक्ती होय. पण त्या दृष्टीने भारतात धर्माचा संपूर्ण लोपच झाला होता असे वरील विवेचनावरून दिसून येईल. सर्व समाजाला बद्ध करील असा एकच आचार, विचार, संस्कार हिंदुमानवसमूहात असताच कामा नये अशी शास्त्रकारांची प्रतिज्ञाच होती. एक आचारविचार हे कलियुगातील अधःपाताचे लक्षण म्हणून त्यांनी सांगितले आहे. एक आचारविचार नाही आणि एका वर्णाला आपल्याच धर्मांतील दुसऱ्या वर्णीयाची सावलीही खपत नाही, इतका बंधुभाव हिंदुधर्मात होता. अशा स्थितीत संघटना होणार कशी आणि टिकणार कशी ? त्यात आणखी या काळात निवृत्तिवादाची, मायावादाची, भर पडली. त्यामुळे हिंदूधर्म हा समाजधर्म असा राहिलाच नाही. तो संपूर्ण व्यक्तिधर्म झाला. आणि एक हिंदू दुसऱ्या हिंदूचा कोणी नाही अशी स्थिती निर्माण झाली. राजधर्म हा सर्व धर्मांत श्रेष्ठ असा महाभारतकारांचा सिद्धान्त आहे. तो आता दृष्टिआड झाला आणि वैयक्तिक स्वर्गमोक्ष, व्रते, उपासतापास,