पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

 पण हिंदुसमाजाच्या एकरूपतेचा, धर्मैक्याचा खरा भंग झाला, तो मुस्लीम आक्रमणामुळे मुस्लीम आक्रमकांनी मृत्युदंड दाखवून हजारो, लाखो लोकांना- हिंदूंना- सक्तीने बाटविले. प्रारंभी या आपत्तीच्या बाबतीत धर्मधुरीण जागृत होते. इ. स. ७१२ साली महंमद कासीम याने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि नंतर हजारो हिंदूंना बाटविले. पण लगेच ८-१० वर्षांनी देवल ऋषींनी नवी स्मृती रचून यांच्या शुद्धीकरण्याची व्यवस्था केली आणि एका महान आपत्तीचे निवारण केले. पण पुढील मूढ शास्त्रकारांना हा सुविचार मानवला नाही. 'कलिवर्ज्य' नामक एक प्रकरण (शास्त्रग्रंथ) रचून त्यांनी पतितपरावर्तन निषिद्ध मानले. आणि एकदा बाटला तो कायमचा बाटला असे ठरून एक प्रचंड हिंदुसमूह मूळ धर्मापासून तुटून निघाला; एवढेच नव्हे तर या हिंदुसमाजाचा कायमचा हाडवैरी बनून त्याच्या उच्छेदाचे कंकण त्याने हाती बांधले. वास्तविक मनूच्या मते सक्तीचे धर्मांतर हे धर्मांतरच नव्हे. (सर्वान् बलकृतान् अर्थान् अकृतान् मनुरब्रवीत्- मनु. ८. १६८) खुषीने धर्मांतर केले असले आणि मग पश्चात्ताप झाला तरी अल्प प्रायश्चित्ताने शुद्धी होते असे याज्ञवल्क्य, कश्यप, विष्णू इत्यादी शास्त्रकारांनी सांगितले आहे. जे मूळचे अहिंदू त्यांनाही चातुर्वर्ण्यात समाविष्ट करून घ्यावे, असे महाभारत, हरिवंश यांत उपदेशिले आहे. पण पुढे पावित्र्याच्या कल्पना फारच उंचावल्या आणि हा विवेक सुटला. (हिंदूंच्या अवनतीची मीमांसा- कोकजे, प्रकरण ७ वे.) आणि हिंदुधर्मातून गेलेला मनुष्य कायमचा पिढ्यान् पिढ्या शतकानुशतक मुस्लिमच कसा राहील याची चिंता हिंदू शास्त्रकार वाहू लागले.
 मुस्लीम झालेले कायम मुस्लीम कसे राहतील एवढीच चिंता करून हिंदू मानवसमूह थांबत नाही. हिंदू असलेल्यांना बाहेर लोटून मुसलमान कसे करता येईल याचीही चिंता हिंदुधर्मीय वाहतात. आचार्य क्षितिमोहन सेन यांनी याचे बंगालमधील एक उदाहरण दिले आहे. ते वाचून कोणाही हिंदूला उद्वेगच येईल. बंगालमधील टिपरा जिल्ह्यात माहीमाल मुसलमान नामक एक समाज आहे. ते लोक मूळचे हिंदू कैवर्त- कोळी होते. एकदा शेजारच्या गावी कॉलरा सुरू होऊन त्यात तेथील सर्व मुस्लीम लोक बळी पडले. फक्त एक लहान मुलगा वाचला. त्याला या कैवर्तातील एका गृहस्थाने आपल्या घरी वाढविले. काही वर्षांनी भोवतालच्या हिंदू समाजाने त्या मुलाचा दीर्घ संसर्ग घडल्यामुळे या सर्व