पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
९७
 

वायू इत्यादी पुराणांत बौद्ध, जैन ही शास्त्रे विष्णूने स्वतःच लोकांना मोह पाडण्यासाठी सांगितली, असेही म्हटले आहे. (काणे, धर्मशास्त्र, ५ वाखंड, पृ. ९७४-७६) मनुष्याने एकदा बुद्धिवाद सोडला, ग्रंथाला प्रमाण मानून त्याचे बंधन मानण्याचा शास्त्रकारांनी दण्डक घातला म्हणजे मनुष्याचा किती अधःपात होतो हे यावरून दिसून येईन. इतर पंथांच्या निंदेची स्वतःची हौस भागविण्यासाठी या पुराणकारांनी शिव, विष्णू यांचेच बळी देऊन टाकले, आपले अधम विचार त्यांच्या तोंडी घालून दिले. अर्थात त्यामुळे या पुराणकारांना इष्ट तो अनर्थ लवकरच घडून आला. हे भिन्न पंथ परस्परांचे वैरी झाले व हिंदु- समाज आणखी भग्न झाला.
 रामानुज (इ. स. १०१६) हे वैष्णवपंथी होते. एका चोळराजाने त्यांचा अनन्वित छळ केला. कुलोत्तुंग या चोळ राजाने (इ. स. ११३३-५०) शैवमताभिमानामुळे गोविंदांची मूर्ती समुद्रात फेकून दिली. आणि शिव-विष्णू यांची एक मूर्ती असलेले देऊळ पाडून टाकले. तिरुक्कदाईयूर येथे ११६० साली धर्मधुरीणांची महासभा भरली होती. तिने शिवमंदिराच्या पुजाऱ्यांना एक ठराव करून बजावले की तुम्ही वैष्णवांत मिसळला तर तुमची मालमत्ता जत करण्यात येईल. याच्या आधीचा चोळ राजा राजराज (इ. स. ९८५-१०१४) व त्याची बहीण कुंदवई यांनी शिव, विष्णू, जिन यांची मंदिरे स्वतः बांधली होती. पण ती सहिष्णू वृत्ती आता नष्ट झाली. यानंतर वैरभाव नष्ट करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. पण एकदा दोन पंथातील स्नेहभाव संपला तो संपला आणि विघटना होऊन समाजाचा अधःपात झाला. (प्रा. नीळकंठशास्त्री, दि चोलाज्, खंड २ रा, भाग १ ला, पृ. ४८८- ९०) बौद्धधर्म या सुमारास भारतातून लुप्त झाला होता. पण जैनधर्म पुष्कळच प्रभावी होता. पण इतके दिवस त्याच्याबद्दल सहिष्णू वृत्ती होती. ती आता नष्ट झाली व सनातन वैदिक धर्म, वीरशैव आणि जैन यांच्यांत नित्य संघर्ष होण्यास प्रारंभ होऊन भारतात आतापर्यंत असलेले धर्मैक्य नष्ट झाले. कुलगुरू चिं. वि. वैद्य यांनी याचे सविस्तर विवेचन केले आहे. ते म्हणतात, या कालविभागात (इ. स. १००० ते १२००, हिंदुधर्मात भिन्न भिन्न द्वेष करणारी मते प्रबळ झाली आणि मजबूत राष्ट्राचे जे एक मुख्य लक्षण धर्मैक्य ते नाश पावून हिंदुस्थान दुर्बल झाले. (मध्ययुगीन भारत, भाग ३ रा, पृ. ५८५-६२२)