पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

की काय याच सुमारास भिन्न भिन्न देवतांच्या अभिमान्यांनी शैव, वैष्णव, शाक्त असे परस्पर व्यवच्छेदक पंथ स्थापून विघटनेचे कार्य पुरे केले. हिंदुधर्म सहिष्णू आहे अशी त्यांची पुरातन काळापासून कीर्ती आहे. पुराणात शिवविष्णू एकरूप आहेत, सर्व देवता एकाच परमेश्वराच्या मूर्ती आहेत असे अट्टाहासाने सांगितल्याचे वर आलेच आहे. वेद, गीता यांचे हेच संग्राहक धोरण होते हे प्रसिद्धच आहे. पण इसवी सनाच्या आठव्या नवव्या शतकापासून काही धर्मधुरीणांची बुद्धी फिरली आणि हिंदुधर्माचे उदार, संग्राहक रूप त्यांना पहावेनासे झाले. आणि त्यांनी पंथभेद माजविण्यास प्रारंभ केला. आपल्या सर्वच धर्भग्रंथांत उत्तरकालीन लोकांनी सारखी भर घातली आहे हे मागल्या लेखात सांगितलेच आहे. शैव, वैष्णव इत्यादी पंथांत विद्वेष माजविणारी, त्यांच्यात वैरभाव चेतविणारी वचने याच पद्धतीने कोणी तरी मागून घातल्याचे स्पष्ट दिसते. अर्थात हा प्रक्षेप कोणी व केव्हा केला हे सांगण्यास कोणतेच प्रमाण उपलब्ध नाही; पण पूर्वीच्या विचारांशी सर्वस्वी विसंगत असे हे प्रक्षेप आहेत त्यामुळे असे म्हणणे युक्त वाटते. किंवा एकाच वेळी दोन्ही विचारप्रवाह चालू होते, समाजपोषक विचारांचे पूर्वी प्राबल्य होते व उत्तरकाळी त्यांचा प्रभाव कमी होऊन घातक तत्त्वज्ञानाची सरशी झाली असे तरी मानले पाहिजे. विघातक विचार केव्हा सांगितले याला महत्त्व कमी. ते प्रभावी केव्हापासून झाले हे पाहण्याला महत्त्व जास्त.
 वराहपुराण, व मत्स्य, वायू, भागवत, पद्म ही पुराणे यांत शैवसिद्धांतांची निरर्ग लनिंदा केलेली आहे. जो वैष्णव नाही तो नास्तिक, लोकांनी विष्णूखेरीज अन्य देवतांची उपासना करू नये, त्यांना नमस्कार करू नये, त्यांच्या देवळांतसुद्धा जाऊ नये असा उपदेश बुद्धहारीतस्मृतीने केला आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य ही दर्शने व पाशुपतासारखी पंथतत्त्वे ही या पुराणांनी वेदबाह्य व तामस ठरवून त्यांच्या स्मरणानेसुद्धा मनुष्य पतित होतो असे सांगितले आहे. या पुराणकारांच्या पुढे एक अडचण होती. काही पुराणांत विष्णूच्या तोंडीच शिवाची स्तुती आहे. मग शैवमत निंद्य कसे ठरणार ? पण यावर त्यांनी एक क्लुप्ती लढविली. त्यांनी पुराणातच असे लिहून ठेविले की स्वतः विष्णूनेच शिवाला विनंती केली, की तुम्ही लोकांना वाममार्गाला नेण्यासाठी असे वेदबाह्य शास्त्र रचा. त्याप्रमाणे शिवाने केले. तेव्हा ही शैव शास्त्रे वेदबाह्यच होत. मत्स्य,