पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
९५
 

इतिहासाच्या प्रत्येक खंडात हेच मत मांडले आहे. त्यांच्या मते सातव्या शतकात हर्षाच्या काळी जातिनिर्बंध बरेच सैल होते. पुढच्या काळात ते कडक होत गेले. त्यामुळे अनुलोम विवाह हळूहळू बंद होत गेले. आणि नंतर ब्राह्मण क्षत्रिय- वैश्यांतही पोटभेद निर्माण होऊन समाज फुटू लागला. (भाग १ ला- पृ. ७८ ते ९६; भाग २ रा, पृ. ३१३-३२१, ३९१-९२; भाग ३, ५३२-५५०) 'आमच्या मते या सुमारास जातिबंधने अधिक दृढ झाली, हे हिंदूंच्या अधःपाताचे कारण आहे.' असे आपले स्पष्ट मत शेवटच्या भागात त्यांनी दिले आहे.
 आंतरवर्णीय विवाह बंद झाले, जातींच्या पोटजाती झाल्या. त्याचप्रमाणे सर्व वर्णाचा एकत्र अन्नपानव्यवहार, जो पूर्वी शास्त्रविहित होता तोही, या सुमारास बंद झाला व समाजाच्या भिन्न घटकांमधील द्वेष वाहू लागला. गौतम, आपस्तंब, बौद्धायन या धर्मसूत्रकारांना सहभोजन पूर्ण मान्य होते. पण आठव्या नवव्या शतकातील स्मृतिकार अंगिरस, व्यास, यम यांनी हे निषिद्ध ठरविले. शूद्राचे अन्न तर यांनी ब्राह्मणाला वर्ज्य ठरविलेच, पण क्षत्रिय वैश्यांचेही बव्हंशी वर्ज्य ठरवून जातीजातीत पाचरी ठोकण्याचे काम पुरे केले. (डॉ. आळतेकर, राष्ट्रकूट, पृ. ३३८) इ. स. ८०० ते १००० या कालाविषयी लिहिताना कुलगुरू वैद्य म्हणतात, या कालातील विशेष लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे सर्व वर्णांच्या लोकांचा होणारा एकत्र अन्नपानादी व्यवहार. अनुलोम विवाहाप्रमाणेच एकत्र भोजनाच्या प्रघाताने समाजात एकजीवपणा व जोम उत्पन्न होई यात शंका नाही. (भाग २रा, पृ. ३२९) पुढील काळात मात्र अन्नपानादिकांविषयी जास्त कडक निर्बंध घालण्यात येऊ लागले. ब्राह्मण आपल्याला जास्त शुचिर्भूत समजू लागले, क्षत्रियांकडून पाणी घेणे हेही त्यांना वर्ज्य झाले. यामुळे जातीजातीतला स्नेहभाव कमी होत गेला यात आश्चर्य नाही. (कित्ता, पृ. ३९१-९६) याच प्रकाराचे विचार म. म. काणे, पं. सातवळेकर, तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांनी व्यक्त केल्याचे मागे सांगितलेच आहे.
 आंतरवर्णीय विवाह व अन्नपानव्यवहार हे निषिद्ध ठरवून उत्तरकालीन शास्त्रकारांनी हिंदु समाजातील भिन्न घटकांना परस्परांपासून तोडून काढले. त्याचाच परिपाक होऊन एका वर्णात पोटजाती निर्माण होऊन आणखी शकले झाली. एवढ्याने हा समाज पुरेसा विघटित होणार नाही अशी चिंता वाटूनच