पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 


आणखी पोटभेद :
 'धर्म अदृष्टफल झाला, धर्मशास्त्राचे नियम हितकारक की घातक हे ठरविण्याचे ऐहिक निकष अमान्य झाले, धर्माधर्माची फले परलोकात मिळतील, पुढल्या जन्मी मिळतील असे शास्त्रकार सांगू लागले की, समाजाचा अधःपात होतो. कारण कोणीही काहीही शास्त्र सांगावे ! इतिहास, अनुभव, तर्क, प्रत्यक्ष व्यवहार अशापैकी ते तपासून पाहण्यास काहीच साधन नाही; त्यामुळे भोळा समाज अदृष्टाच्या भीतीने ते मानू लागतो. सहाव्या सातव्या शतकानंतर स्मृतींनी मिश्र विवाह, आणि सर्व वर्णांचा एकत्र अन्नपानव्यवहार निषिद्ध ठरविला आणि समाजही ते मानू लागला व त्यामुळे हिंदू समाजाची विघटना होऊ लागली. आणि ही विघटनेची वृत्ती पुढे, शास्त्रकारांच्या मूढतेमुळे, बळावतच गेली. अनुलोम विवाह पूर्वी शास्त्रविहित होते आणि व्यवहारातही ते घडून येते होते. पण हळूहळू शास्त्रकार त्याचा निषेध करू लागले. आणि हिंदुसमाजाचे भिन्न वर्ण एकमेकांपासून दूर जाऊ लागले. पुढल्या काळात या समाजाच्या आणखी चिरफळ्या होऊ लागल्या. आतापर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चारच वर्ण होते. यांच्या संकरातून निर्माण झालेली संतती कधी पित्याच्या वर्णाची तर कधी मातेच्या वर्णाची ठरे. किंवा वर सांगितल्याप्रमाणे या संततीची शास्त्रकार वेगळीच जात मानीत. पण अजून या चार वर्णात पोटवर्ण किंवा पोटजाती झाल्या नव्हत्या. अखिल भारतातील ब्राह्मण किंवा क्षत्रिय किंवा वैश्य यांचा एकच वर्ण असे. त्यांच्यांत आणखी पोटभेद नव्हते. पण अकराव्या शतकापासून ब्राह्मणांत पंचगौड व पंचद्रविड हे भेद होऊ लागले आणि मग एका प्रांतातही कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, देवरुखे, सहवासी, पळशे अशा पोटजाती निर्माण झाल्या. आणि याचप्रमाणे क्षत्रिय व वैश्य या वर्णाचीही शकले झाली. अर्थात पोटजातीबरोबर उच्चनीचतेचा दुरभिमान निर्माण होऊन समाज छिन्नभिन्न होऊ लागला. डॉ. आळतेकर म्हणतात, अत्रिसंहितेसारख्या स्मृती, या प्रांतातले ब्राह्मण हीन, त्या प्रांतातले श्रेष्ठ, असे सांगून या विघटक वृत्तीचे पोषणच करीत राहिल्या. त्याचा हळूहळू परिणाम होऊन पुढल्या काळात प्रांतभेद बळावले व समाज विदीर्ण झाला. (राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स, पृ. ३३५) कुलगुरू चिं. वि. वैद्य यांनी आपल्या मध्ययुगीन