पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
९३
 

की नाही, अकल्याणच झाले की काय, हे पाहण्याचे काहीच साधन उपलब्ध नसल्यामुळे, स्मृतिकारांची लहर एवढेच धर्माला प्रमाण राहिले आणि हिंदु- समाजाचा अधःपात झाला. प्राचीनकाळी व्यवहार, परिस्थिती पाहून, अनुभव, बुद्धी, तर्क यांच्या आधारे शास्त्रनिर्णय करण्याची पद्धत होती, हे आपण विसरता कामा नये.

तस्मात् कौन्तेय विदुषा धर्माधर्मविनिश्चये
बुद्धिमास्थाय लोकेस्मिन् वर्तितव्यं कृतात्मना ॥

हे अर्जुना, म्हणून विद्वानाने या जगात बुद्धीचा अवलंब करून धर्माधर्माचा निश्चय करावा व त्याप्रमाणे वागावे. (शांति, १४१ -१०२)

केवलं शास्त्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णयः ।
युक्तिहीने विचारे तु धर्महानिः प्रजायते ॥

केवळ शास्त्राचा आश्रय करून धर्मनिर्णय करू नये. तर्कहीन विचार केला असता धर्महानी होते. (पाराशर माधवीये- बृहस्पतिः)

देशकालौ तु संप्रेक्ष्य बलाबलमथात्मनः ।
नादेशकाले किंचित् स्यात् देशकालौ प्रतीक्षताम्

(वनपर्व २८-३२)

परिस्थिती व आपले बलाबल पाहूनच कोणताही निर्णय करावा.
 अशा तऱ्हेची शेकडो वचने प्राचीन धर्मग्रंथांत सापडतात. महाभारत, रामायण, कौटिल्याचे अर्थशास्त्र, नारदस्मृती असे काही व्यवहारवादी, वास्तवादी, बुद्धिवादी ग्रंथ त्या काळात होऊन गेले. साधारणपणे इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत झालेल्या स्मृतींतही, अनेक ठिकाणी अशी समाजाभिमुख दृष्टी असल्याचे, दिसून येते. पुढे या दृष्टीचा लोप झाला आणि मग रघुनंदन, कमलावर भट्ट यासारखे देशकाल न पाहणारे, समाजपराङ्मुख, विवेकहीन, मूढ शास्त्रकार निपजू लागले. आपल्या या शास्त्राने बहुजनसमाज व एक मोठा राज्यकर्ता वर्ग किती दुखावेल, त्यामुळे हिंदू समाज किती विघटित होईल, एक वर्ण दुसऱ्या वर्णापासून असा तोडून काढण्यात आपण केवढे घोर पातक करीत आहो, याचा विचारही या पंडितांच्या मनाला शिवला नाही. यावरून उत्तर काळचे हे शास्त्रकार किती वेजबाबदार होते व यांच्यामुळेच धर्महानी होऊन हिंदुसमाज शतधा कसा भग्न झाला याची कल्पना येईल.