पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

फक्त त्या व्यक्तीपुरती आहे. चांडाळ म्हणून जी जात आहे ती यामुळे अस्पृश्य ठरत नाही. शूद्रब्राह्मणी या संकरातून झालेली अपत्ये यांना लावलेला चांडाळ शब्द पारिभाषिक आहे, तो जातीचा वाचक नाही. चांडाळ जाती ही शूद्र आहे. म्हणून ती स्पृश्यच आहे. वरील पारिभाषिक चांडाळ हे मात्र खरे जन्माजात अस्पृश्य. इतर काही अस्पृश्य शास्त्रात सांगितले आहेत ते जन्मजात नव्हेत. ते केवळ त्यांच्या हीन व्यवसायामुळे अस्पृश्य झालेले असतात. आणि तेही तेवढ्या वेळापुरतेच. त्यातून ते मोकळे झाले, स्वच्छ झाले की ते स्पृश्य होतात. पारिभाषिक चांडाळ सोडले तर इतरांच्या बाबतीत जी अस्पृश्यता मानली जाते ती, उत्तरकालीन रूढीमुळे आलेली आहे. तिला शास्त्राधार नाही. रूढिवादी लोकांनी आपल्या लहरीप्रमाणे हा कडकपणा अवलंबिलेला आहे. (अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, भाग ४ था व ५ वा.) अस्पृश्यता पूर्वी नव्हती, अस्पृश्यांच्या दर्शनाने द्विज अपवित्र होतात, त्यांच्या सावलीनेही विटाळ होत असले मूर्ख दण्डक मनुयाज्ञवल्क्यांच्या स्वप्नांतही नव्हते. १० व्या शतकात झालेल्या मेधातिथीनेही असेच मत मांडले आहे. त्यानंतरच्या काळात सर्वच जातिबंधने कडक होऊ लागली. दूरीकरणाची, भेदाची प्रवृत्ती वाढत चालली आणि त्यानंतर अस्पृश्यता निर्माण झाली. (म. म. काणे, धर्मशास्त्र, खंड २ रा, प्रकरण ४ थे) या बाबतीत काणे यांनी व्याघ्रपाद, बृहस्पती, अपरार्क, कुल्लूक यांचा निर्देश केला आहे. आपल्या टीकांमधून त्यांनी अस्पृश्यतेचे शास्त्र सांगितले आहे. पण पूर्वपरंपरेला ते मुळीच मान्य नव्हते.

समाजपराङ्मुख :
 या शास्त्रकारांचे हे शास्त्र पाहिले की, वस्तुस्थिती पाहून, परिस्थितीचा अभ्यास करून समाजाच्या उत्कर्षापकर्षाकडे सतत लक्ष ठेवून, धर्मनियम सांगावयाचे असतात, हे प्राचीन ऋषींचे थोर तत्त्व जाणण्यास हे शास्त्रकार असमर्थ होते, हे स्पष्ट दिसून येते; आणि हेच उत्तरकाळच्या हिंदुसमाजाचे मोठे दुखणे आहे. धर्मामुळे अर्थकामही प्राप्त करून घ्यावयाचे असतात, धर्म हा लोकांच्या प्रभवासाठी, अभ्युदयासाठी असतो, ही दृष्टीच पुढल्या काळी नष्ट झाली. आणि शास्त्रकारांनी धर्म अदृष्टफल करून टाकला. अमका शास्त्रनियम योग्य की अयोग्य हे तपासून पाहण्याचा निकष पारलौकिक कल्याण हा झाला. ते कल्याण किती झाले, झाले