पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
९१
 

सर्व शूद्रांना तसे होणार नाही. पण पुढील काळातील शूद्रांना पूर्वजन्मीची पुण्याई नव्हती हे या शास्त्रकारांनी कसे ठरविले ? पण असा प्रश्न विचारणे हेच चूक आहे. कोणत्याही सुसंगत युक्तिवादावर त्यांचे शास्त्र उभारलेलेच नाही. त्यांना तसे उभारण्याचे सामर्थ्यच नव्हते. ज्यांना तशी ऐपत होती त्यांनी अगदी रोख व्यवहार पाहून, प्रत्यक्ष अवलोकन करून, आपले धर्मशास्त्र रचले होते. त्यामुळे शूद्र राजा होण्यास हरकत नाही, शूद्राला मंत्रिपद देण्यास हरकत नाही, चारित्र्यावरून वर्ण ठरवावा, अशा तऱ्हेचे निर्णय त्यांनी दिले होते. त्यांच्या त्या धर्मशास्त्राचे सविस्तर विवेचन गेल्या लेखात केलेच आहे. येथे आपण त्याच्याविरुद्ध असलेल्या दुसऱ्या विचारप्रवाहाचा, अगदी भिन्न अशा तत्त्वप्रणालींचा, धर्मशास्त्राचा विचार करीत आहो. शूद्रांना धर्मबाह्य लेखून कायमचे पतित मानून एक बहुसंख्य मानवसमूह जीवनातून उठविण्याचे कार्य त्या धर्मशास्त्राने केले आहे. ते एवढेच करून थांबले नाही. हिंदुसमाजाच्या चिरफळ्या करण्याचे धोरण आणखी पुढे नेऊन, त्यांनी शूद्रांतून काही जाती तोडून काढून, त्यांना पूर्ण अस्पृश्य करून टाकले. आज भारतात ७-८ कोटी अस्पृश्य आहेत. यावरून केवढ्या मोठ्या मानवसमूहाची या धर्मशास्त्राने हत्या केली आहे हे ध्यानात येईल.

अस्पृश्यता अशास्त्रीय :
 पं. सातवळेकर, श्रीधरशास्त्री पाठक, म म. काणे या पंडितांचे असे निश्चित मत आहे की, पूर्वकाळी अजच्यासारखी अस्पृश्यता मुळीच नव्हती. काणे म्हणतात की, वेदवाङ्मयात चर्मकार, चांडाळ, पौल्कस ही नावे आहेत. पण या जाती अस्पृश्य आहेत, असा कोठेही निर्देश नाही. आरंभीच्या काही स्मृती चारच वर्ण मानतात. मनूच्या मते पाचवा वर्णच अस्तित्वात नाही. याचा अर्थ असा की, त्या काळी आजच्या अस्पृश्यांची गणना शूद्र वर्णातच होत असे. आणि शूद्राच्या हातचे अन्न खाण्यास सुद्धा इ. सनाच्या ८ व्या ९ व्या शतकापर्यंत शास्त्रकारांची हरकत नव्हती. वरील तीनही पंडितांच्या मते, जन्मजात अस्पृश्यता हिंदुधर्मशास्त्रात फक्त एका चांडाळाच्या बाबतीत सांगितलेली आहे. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांचे अपत्य म्हणजे चांडाळ. तोच फक्त जन्माने अस्पृश्य. श्रीधरशास्त्री पाठक म्हणतात, ही अस्पृश्यता