पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

विषयीही प्रश्न उद्भवतो. हे विवाह चालू ठेवले असते तर हिंदू समाजावर कोणते संकट कोसळले असते ? अलीकडे असा एक युक्तिवाद करण्यात येतो की, पूर्वी असे विवाह चालू होते पण त्यांचे वाईट परिणाम पाहूनच पुढील शास्त्रकारांनी ते निषिद्ध मानले. पण प्रश्न असा येतो की, असे कोणते वाईट परिणाम या शास्त्रकारांना दिसून आले ? त्यांच्या या शास्त्रनियमांचे समर्थन करणाऱ्या अर्वाचीन विद्वानांनी तरी, त्या मिश्रविवाहांमुळे कोणते वाईट परिणाम झाले, तें सांगि- तले आहे काय ? मुळीच नाही. हे अर्वाचीन पंडित तरी इतिहास पाहू शकत होते ना ? मग त्यांनी कोणत्या इतिहासाच्या आधारे या बेटीबंदीचे समर्थन केले ? इतिहासकाळातला अखिल भारताचा पहिला साम्राट चंद्रगुप्त मौर्य हा शूद्र होता. सम्राट अशोक हा त्याचा नातू अर्थातच शूद्र होता. दक्षिणेत प्रथमच साम्राज्य स्थापन करणारे सातवाहन घराणे शूद्र होते. ही मते पुराणांनीच मांडली आहेत. इतिहासपूर्व काळातील आविक्षित मरुत्त हा शंभर अश्वमेध करणारा महाराजा शूद्र होता. पुराणे ज्या काळात लिहिली जात होती त्या काळात गुप्तसाम्राज्य विस्तारत होते. गुप्त हे वैश्य होते. पण त्यांचा पहिला सम्राट चंद्रगुप्त याने लिच्छवी या क्षत्रिय घराण्यातील राजकन्येशी लग्न केले होते. म्हणजे हा प्रतिलोम विवाह होय. भारताचा नेपोलियन म्हणून ज्याची कीर्ती आहे तो सम्राट समुद्रगुप्त हा प्रतिलोम विवहाहातूनच जन्मला होता. या घराण्यात कदंब या ब्राह्मण राजघराण्यातील कन्याही दिल्या होत्या. म्हणजे आणखी प्रतिलोम. शास्त्रकारांच्या मते सर्व प्रतिलोमसंतती ही शूद्र होय. अर्वाचीन पंडित म्हणतात त्याप्रमाणे, चांगले वाईट परिणाम पाहून, शास्त्रकारांनी आपले शास्त्र लिहिले असते, तर असल्या विवाहाचा त्यांनी पुरस्कारच केला असता. पण देश काल बघून परिस्थिती अभ्यासून, प्रत्यक्ष अवलोकन करून बुद्धीच्या, तर्काच्या आश्रयाने निर्णय करण्याची ऐपतच या शास्त्रकारांच्या ठायी नव्हती. त्यांच्या कोणत्याही ग्रंथात तर्कनिष्ठ कारणे कोणत्याही प्रसंगी दिलेली नाहीत. असे केल्याने सर्व कुळ नरकात जाईल, पुढील जन्मी ते लोक कृमिकीटक होतील, अनंत जन्म या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागेल, अशीच कारणे ते देतात. पूर्वकाळी विदुर व धर्मव्याध हे दोघे शूद्र असून मोठे धर्मवेत्ते होते, म्हणून शूद्रांना धर्माधिकार आहे, असे कोणी म्हणेल. त्यावर या शास्त्रकारांचे उत्तर असे आहे, की पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झाले होते म्हणून