पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
८९
 

अवलंब करून सद्गती मिळविता येते, हे जसे हिंदू शास्त्रकारांना मान्य आहे, त्याचप्रमाणे शुद्रांना, अस्पृश्यांना वेदमार्गाने सद्गती प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांना मान्य असावयास हरकत नव्हती. पण ते हिंदू होते व आहेत हाच त्यांचा अपराध आहे. सहिष्णू वृत्ती परक्यांच्या बाबतीत !. स्वकीयांशी वागताना तिचा संबंध येतो कोठे ?

वैज्ञानिक अवडंबर :
 शूद्रांना यज्ञाधिकार दिला असता, ब्राह्मणांनी त्यांना वेद शिकवून आपल्या थोर धर्माची दीक्षा त्यांना दिली असती, तर काय बिघडले असते ? अर्वाचीन ध्वनिशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायन यांच्या आधारे जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्याचे समर्थन बाळशास्त्री हरदास करीत असतात. ते म्हणतात, 'वेदमंत्रांच्या ठायी काही स्वयंभू शक्ती असते, ती विशिष्ट शब्दसंघातांतून निर्माण होते, त्या शब्द- संघातांचे योग्य उच्चार करण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याच कंठात असते, म्हणून. त्यांना श्रेष्ठपद निसर्गतःच मिळणे योग्य होय. आणि उच्च श्रेणीच्या ध्वनिशास्त्राला धरून केलेली त्रिवर्णात्मक समाजरचनाही योग्य होय.' बाळशास्त्री यांनी अशा तऱ्हेचे बरेच पांडित्यपूर्ण विवेचन, विज्ञानाची परिभाषा वापरून आपल्या 'वेदांतील राष्ट्रदर्शन' या ग्रंथात केले आहे. (पृ. १३७- १७९) पण भारतावर आलेल्या अनेक भयावह आपत्ती, त्याचप्रमाणे वेदकाळात, पुराणकाळात व ऐतिहासिक काळात या भूमीवर झालेली आक्रमणे व येथे घडलेले अनेक अनर्थ यांचे निवारण करण्यास ब्राह्मणांना वेदमंत्रांच्या पठनामुळे प्राप्त झालेली अलौकिक शक्ती उपयोगी पडली, असे जोपर्यंत सिद्ध होत नाही, ब्राह्मणांना व क्षत्रियांना मुत्सद्देगिरी, राजनीती, शस्त्रविद्या, बाहुबल यांचा इतर देशांतल्याप्रमाणेच या आपत्तींच्या निवारणासाठी आश्रय करावा लागला हे जोपर्यंत दिसत आहे, तोपर्यंत वैज्ञानिक भाषेतले हे सर्व अवडंबर व्यर्थच ठरणार. आणि व्यास, वसिष्ठ, अस्तिक, शौनक यांसारखे अनेक संकरज ब्राह्मण वेदमंत्रांचा योग्य उच्चार करू शकत होते हे जोपर्यंत असिद्ध होत नाही तोपर्यंत जन्मसिद्ध चातुर्वर्ण्याचे समर्थन हास्यास्पदच ठरणार !

संकर हितावह :
 शूद्रांच्या वेदाधिकाराप्रमाणेच पूर्वी होत असलेल्या अनुलोम-प्रतिलोम विवाहा-