पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७१ प्रतिगामी राष्ट्रवाद पत्करावी लागली. बनारस येथे १९०५ साली भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशन प्रसंगी लो. टिळकानी अर्वाचीन उद्योगधंद्याच्या वाढीनेच हिंदी दारिद्याचा प्रश्न सुटणार आहे असे भाषण करून पुरोगामी सामाजिक तत्त्वज्ञानाचा विजय नकळत कबूल केला. | येथपर्यंत काँग्रेस ही संस्था फक्त बडे जमिनदार, भांडवलदार आणि मातबर बुद्धिजीवि यांचीच होती. लो. टिळक, बिपिन बाबू आणि अरविंद घोष यानी काँग्रेस पुढान्यांचे दोष, विशेषतः त्यांची निष्क्रियता आणि भेकड वृत्ति यांचा अविष्कार करून आपल्याभोवती युवक गोळा केले.कनिष्ठ मध्यम वर्गीय, प्रमुखतः बेकार बुद्धिजीवी यांचा भरणा काँग्रेसमध्ये होऊ लागला. त्याबरोबर त्यांच्या मनावरची अध्यात्मिक आणि सनातनी पकड शिथिल होऊ लागली. देशाच्या औद्योगीकरणाचे पुरोगामी तत्त्वज्ञान त्याना पटू लागले. त्यांची परिस्थिति बेकारीची आणि हलाखीची असल्यामुळे त्यानी आपले विचार ताबडतोब अमलात आणण्यास प्रारंभ केला. बोलघेवड्या मातबर नेमस्त बुद्धिजीवींच्या पुढे राजकारणात त्यानी आघाडी मारली. कनिष्ठ मध्यम वर्ग हा दिवाळखोर बनला होता. प्रचलित समाज व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणे त्याला अवश्य होते. परंतु संपन्न बुद्धिजीवि आणि मत्ताधीश भांडवलदार याना प्रचलित वस्तुस्थितीत क्रांतिकारक फेरफार नको होते. आपले धन आणि हक्कबाबी यांच्या संरक्षणार्थ सरकारचे सहाय्य त्याना सर्वतोपरी हवे होते. मातबर मध्यम वर्गाचे सामाजिक तत्वज्ञान कितीही पुढारलेले होते, तथापि ब्रिटिश सरकारला तो दुखविण्यास तयार नसल्यामुळे तो वर्ग कृतीत सदैव शेळपट आणि निष्क्रियच राहिला.. कनिष्ठ मध्यम वर्गाची गोष्ट तशी नव्हती. त्याजजवळ गमाविण्याजोगे असे काहीच नव्हते. ह्मणून तो राजकारणात बेफाम बंडखोर बनू शकला. त्याच्या डोक्यात ब्रिटिश राजवटी उलथून टाकण्याचे ज्वलज्जहाल विचार शिरू शकले. एकंदरीत काँग्रेसमध्ये झालेल्या कनिष्ठ मध्यम वर्गाच्या प्रवेशामुळे काँग्रेस जोमदार आणि सक्रिय बनू लागली.