पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदांत व हक्क. ८९

 मानवकुलाचा आजपर्यंतचा सामान्य इतिहास पाहिला तर त्यांत दोन प्रकारच्या शक्तींचे कार्य आढळून येते. एका प्रकाराने समाजांत जातिविशिष्टत्व निर्माण होत असते आणि दुसऱ्याने त्याचा भंग होत असतो. एक प्रकार विशिष्ट हक्क निर्माण करीत असतो आणि दुसरा प्रकार त्या हक्कांचा नाश करीत असतो. एका प्रकाराने मनुष्यामनुष्यांत कुंपणे निर्माण होत असतात आणि दुसऱ्याने त्यांचा विध्वंस होत असतो. अशा रीतीने या विशिष्ट हक्कांचे निर्मूलन जेव्हा जेव्हां होते तेव्हां तेव्हां त्या मानववंशांत ज्ञानाचा प्रकाश अधिक जोराने फांकत असतो, असा इतिहासाचा अनुभव आहे. शक्तीच्या या दोन स्वरूपांचा तंटा आपणाभोंवती नेहमी चालू आहे हे आपण पाहतोच. आपणांस कांही विशिष्ट हक्क आहेत असे मानणारी माणसे जगांतील प्रत्येक समाजांत असतात. विशिष्ट हक्कांचे हे खूळ समाजाच्या जन्माबरोबरच जन्म पावलेले असते. ' बळी तो कान पिळी ' ही म्हण या स्थितीचीच द्योतक आहे. बलिष्ठांनी निर्बलांवर साम्राज्य गाजविण्यास सुरवात केली की हक्काचे खूळ माजत जाते. गरिबांनी आपली सेवा करावी यासाठीच त्यांचा जन्म आहे असें श्रीमंतांस वाटत असते. केवळ पैशाच्या जोरावर ते विशिष्ट हक्क निर्माण करूं लागतात. ज्या मानाने पैसा अधिक त्या मानाने हक्कही वाढत जातात. शरीरबळ आणि पैसा यांहूनही अधिक सूक्ष्म पण अधिक जोरदार अशी आणखी एक हक्काची बाब आहे. बुद्धिमंत लोक निर्बुद्धांवर जो हक्क गाजवितात तो मागील दोन प्रकारांहून अधिक तीव्र आहे. केवळ अधिक ज्ञान आहे येवढयाच जोरावर ही शहाणी म्हणविणारी माणसे आजूबाजूच्या समाजावर आपले हक्क गाजवीत असतात. हक्काचा आणखीही एक प्रकार आहे, तो तर या सर्वांहून अत्यंत निंद्य आहे. या हक्काचे वर्णन करावयाचे तर तें सुलतानी किंवा सैतानी हक्क अशा शब्दांनी करता येईल. हा हक्क गाजविणाराला कांहीं कार्यकारणभाव पाहण्याचे सुद्धा प्रयोजन नाही. धर्मगुरु आपल्या शिष्यमंडळावर जो हक्क गाजवितात तो हा होय. स्वतःस साधु अथवा सद्गुरु ह्मणविलें की शिष्याकडून वाटेल त्या गोष्टी करविण्याचा ताम्रपट, जणूं काय, या लोकांस प्राप्त होत असतो आणि एखाद्या जुलमी सुलतानाप्रमाणे त्याची अंमलबजावणी ते करीत असतात. ईश्वरविषयक ज्ञान मला इतरांपेक्षा अधिक आहे अशी एखाद्याची समजूत