पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम

एकदां झाली की भेटेल त्या प्रत्येक व्यक्तीवर तो आपला हक्क गाजवू लागतो. 'अहो मानवाच्या क्षुद्र पोरांनों, आमची पूजा करा; आम्ही परमेश्वराचे दूत तुमच्या कल्याणासाठी अवतरलो आहो. आमची पूजा अर्चा करावी हेच तुमचे कर्तव्य आहे.' असल्या प्रकारची भाषा ते खुशाल वापरूं लागतात. अशा प्रकारचे विशिष्ट हक्क कोणासही असणे इष्ट नाही. असे हक्क असावे असें म्हणणारा कोणीही मनुष्य खरा वेदान्ती होऊ शकणार नाही. शारीरिक बळाच्या आधिक्यामुळे, बुद्धीच्या अधिक प्रखरतेमुळे अथवा ईश्वरविषयक ज्ञानाच्या प्राप्तीमुळे असो, असे हक्क प्राप्त होणे अनिष्ट आहे. कोणत्याही कारणामुळे कोणासही कोणावर सुलतानी हक्क असू नये. सर्व मनुष्यांत एकाच शक्तीचा वास आहे. फरक इतकाच की कोणामध्ये तिचे स्वरूप अधिक स्पष्ट असते तर कोठें तें कमी स्पष्ट असते. या मूलशक्तीचें स्पष्टीकरण पूर्णत्वाने करण्याची सोय सर्वांस आहे. मग विशिष्ट हक्कांना कारण कोठे राहिले ? अज्ञानानें कोणी कितीही व्याप्त असला तरी त्याचा आत्मा संपूर्ण ज्ञानवान् आहे. आता त्याचे ज्ञान प्रकट दिसत नाही हे खरे, पण असे होण्याचे कारण त्याला तशी संधि सांपडली नसेल असेंही असू शकेल. ज्ञानाच्या प्रकटीभवनास अनुकूल अशी परिस्थिति कदाचित् त्याला प्राप्त झाली नसेल. तशी संधि मिळाली म्हणजे आपले ज्ञानस्वरूप तोही प्रकट करील. केवळ विशिष्ट कुलांत जन्म होण्याचा योग आला येवढयावरून कोणालाही विशिष्ट हक्क प्राप्त होतात या म्हणण्याला वेदान्ताचा आधार कधीही मिळावयाचा नाही. वेदान्ताच्या परिभाषेत या शब्दांना काही अर्थच नाही. त्याचप्रमाणे एक राष्ट्र जन्मतः कमी दर्जाचे आणि दुसरे जन्मतःच श्रेष्ठ हे शब्दही वेदान्तशास्त्र दृष्टीने अर्थशून्य होत. दोघांनाही सारख्याच परिस्थितीत ठेवा म्हणजे दोन्हीही मूलशक्तीचे प्रकटीकरण सारखेच करतात की नाही हे तुम्हांस दिसेल. अशारीतीने कसोटी लागण्याच्या अगोदर अमुक राष्ट्र क्षुद्र आणि तमुक मोठे असें तुम्हास कधीही म्हणतां यावयाचे नाही. धर्मज्ञानालासुद्धा हाच सिद्धांत लागू आहे. त्यांतसुद्धा विशिष्ट हक्कांचे स्तोम माजतां उपयोगी नाही. आपला खरा हक्क म्हटला म्हणजे मनुष्यजातीची सेवा करणे हा होय; कारण ती सेवा म्हणजे परमेश्वराचीच सेवा आहे. इतक्या या नानाविध रूपांनी परमात्माच प्रकट झाला आहे. मनुष्याचा जीवात्माही तोच. परमेश्वर स्वतः