पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

८८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

येत नसून ही दोन्ही अंतर्गत आहेत असा तो सिद्धांत होय. ज्याला आपण सृष्टि असें नांव देतो, ते केवळ आरशासारखे आहे. सृष्टीचा खरा उपयोग म्हटला तर याहून अधिक नाही. ज्याला आपण ज्ञान असें म्हणतो तेंही केवळ प्रतिबिंब आहे. अंतर्गत ज्ञानस्वरूपाचे जे प्रतिबिंब या सृष्टिरूप आरशांत आपणांस दिसते त्याला आपण ज्ञान असें नांव देतो. त्याचप्रमाणे सृष्टशक्ती या नांवाने जी कार्यकारी रूपें आपण विश्वांत पाहातों ती सारी स्वरूपेंही या मूल अंतर्गत चिच्छक्तीच्या छाया होत. ही सारी स्वरूपें सृष्टीत गूढ रूपानें वास करतात असे आपणास वाटते; पण बाह्य सृष्टीशी मूलशक्तीचा संबंध नाही. ती अंतर्गत असून तिचे प्रतिबिंब मात्र अनेक रूपांनी आपण सृष्टीत पाहत असतो. बाह्य सृष्टींत अनेक घडामोडी होत असतात आणि त्यांच्या द्वारें मूलशक्ति प्रतिबिंबरूपाने दिसत असते. ज्ञानाचा वास सृष्टीत नाही. ज्ञानाचा झरा मानवी आत्म्यांत आहे, आणि त्याचे तुषार प्रतिबिंब रूपाने सृष्टीच्या घडामोडींत दिसतात. अमूर्त ज्ञानाला मूर्तरूप देण्याचे काम मनुष्य करतो. बाह्य सृष्टींतून मी ज्ञान मिळवितों असें मनुष्य म्हणतो त्या वेळी स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या अव्यक्त ज्ञानाला व्यक्त रूप देऊन त्याकडे तो पाहतो आणि इतकें ज्ञान मी मिळविलें असें तो म्हणू लागतो. तें ज्ञान सृष्टींतून त्याला प्राप्त झालेले नसते; पण सृष्टीच्या द्वारा ते त्याच्या प्रत्ययाला मात्र आलेलें असतें. वस्तुतः ज्ञान त्याजपाशीच असते. ज्ञानाचा अखंड वास त्याजपाशी अनंत कालापासून आहे. त्याच्याजवळून ते कोणी हिरावून नेले नव्हते आणि आता ते त्याला सृष्टीने परत दिले असेंही नाही.सच्चिदानंद हे प्रत्येकाचे स्वभावजन्य रूप आहे.

 यावरून मूलतः सर्व मनुष्ये एकाच स्वरूपाची आहेत हे उघड होत नाही काय? त्यांच्यांत आढळून येणारा फरक कमी अधिक व्यक्तदशेमुळे मात्र उत्पन्न झालेला असतो. मनुष्यांत मूलस्वरूपाचा उच्चनीच भाव नाही. याकरितां आपणास काही विशिष्ट स्वरूपाचे हक्क जन्मजात आहेत असे म्हणणे तत्त्वदृष्ट्या अशास्त्रीय आणि व्यवहारदृष्टया अनर्थमूलक आहे. अमुक क्षुद्र, मी थोर, अमुक गुलाम, मी धनी अशा प्रकारच्या भावनांनीच आजपर्यंत अनेक उत्पात जगांत घडवून आणले आहेत. जगांतील अनेक अनर्थांचें, युद्धांचे आणि आपत्तींचें मूल या दुष्ट भावनेंत आहे.