पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदान्त व हक्क. ७९

पाहिला तर ईश्वर म्हणजे पूर्ण स्वतंत्र वस्तु ही कल्पना अगदी आरंभापासून अस्तित्वात असल्याचे आपणास आढळून येते. जी वस्तु पूर्ण स्वतंत्र म्हणजे स्वयमेव असेल तीच घडामोडीच्या पलीकडे असणार हे उघड आहे. याकरितां स्वतंत्रता आणि नित्य एकरूपता हे शब्द पूर्ण समानार्थवाचक आहेत असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. जे स्वतंत्र आहे तेंच नित्य एकरूप राहणार आणि जे नित्य एकरूप आहे तेंच स्वतंत्र असणार. कोणत्याही वस्तूंत घडामोड निर्माण होते तिची कारणे दोन प्रकारची असू शकतात. एक असें की त्या वस्तूवर दुसऱ्या बाह्य वस्तूची क्रिया घडून मूल वस्तूचे रूपांतर होते. अथवा दुसरे कारण हे की ज्या घटकांची ती वस्तु बनली असेल त्यांतील कांहीं अधिक बलिष्ठ होऊन त्या वस्तूंत विघटना उत्पन्न करतात. ज्या कोणत्याही वस्तूच्या स्वरूपांत बदल घडून येणे शक्य असेल ती वस्तु स्वतंत्र असूं शकणारच नाही. ती वस्तु आजूबाजूच्या एक अथवा अनेक कारणांनी बद्ध असली पाहिजे.
 आतां ईश्वरच सृष्टिरूप झाला अशी कल्पना घटकाभर केली तर ईश्वराचें अस्तित्व येथे कायम राहूनही त्याच्या स्वरूपांत बदल झाला असें कबूल करावे लागेल. अनंतरूपांत बदल होऊन हे समर्याद विश्व उत्पन्न झाले असें म्हटलें म्हणजे या विश्वाइतक्या आकाराचा अमर्याद स्वरूपाचा तुकडा मूलरूपांतून उणा झाला असें म्हणावे लागेल. याचा इत्यर्थ इतकाच की परमेश्वर म्हणजे अमर्यादरूपांत विश्वरूप वजा घालतां शिल्लक राहिलेला भाग. अशा रीतीने जो बदलू शकतो अथवा ज्याच्या स्वरूपांत खंड पडतो तो पदार्थ परमेश्वर कसा म्हणावा ? ही अडचण दूर करण्याकरितां वेदान्ताने एक मोठ्या धीटपणाची उपपत्ति पुढे आणली आहे. ती उपपत्ति अशीः हे विश्व ज्या रीतीने आपणास प्रतीत होते असे वाटतें त्या रीतीनें तें खरोखर अस्तित्वात नाही. जे बदलू शकत नाही, त्यांत बदलही झालेला नाही. हे सारे विश्व ही नुसती देखत भूल आहे. यांत सत्य असे काही नाही. विश्वांत अनेक घटक आहेत असे आपणास वाटते; आणि त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थ इतरांपासून भिन्नसा आपणास वाटतो; पण वस्तुस्थिति अशी नाही. विश्वांत अनंत प्राणी प्रत्येकी वेगवेगळे आहेत असे आपणास वाटते; पण हे आपले वाटणेही चुकीचे आहे. अशा प्रकारची ही उपपत्ति आहे. परमात्मरूपांत