पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

येईल. शून्यांतून सृष्टि निर्माण झाली असे म्हणणे म्हणजे अभावांतून भाव निघाला अथवा नास्तित्वांतून अस्तित्व निर्माण झाले असे म्हणण्यासारखेंच आहे, आणि हे म्हणणे तर उघड उघड विरोधात्मक आहे. जगांत कोणतेही कार्य घडले की त्याला कारण अवश्यमेव असते हा आपला रोजचा अनुभव आहे; आणि कारणच कार्यरूप होते हे आपण पूर्वी अनेकवार सिद्ध केले आहे. कारणाचे बदललेलें रूप तेंच कार्य. अव्यक्त कारणाची व्यक्तदशा तेंच कार्य. अत्यंत सूक्ष्म बीजांतून महावृक्ष निर्माण होतो. वृक्ष म्हणजे काय ? बीज, हवा आणि पाणी यांचे संयुक्त रूप. त्या वृक्षाचा देह घडला जात असता त्याने हवा आणि पाणी ही आपल्या पोटांत किती सांठविली याचे गणित समजावयास काही मार्ग आपणास उपलब्ध असता, तर या साऱ्यांच्या बेरजेचे वजन आणि वृक्षाचे वजन ही तंतोतंत सारखी आहेत असे आपणास कळून आले असते. कारणरूप बीज, हवा आणि पाणी ही कार्यरूप वृक्षाबरोबर आहेत असे निर्विवाद सिद्ध झाले असते. ही गोष्ट अर्वाचीन भौतिकशास्त्रांनी निर्विवाद सिद्ध केली आहे. कार्य म्हणजे कारणाचेच रूपांतर हा सिद्धांत अर्वाचीन शास्त्रांसही पटला आहे. कारणरूपांतील घटकांच्या जुळणीत फेरबदल आणि घडामोड होऊन कार्य बनते. याकरिता विश्व या कार्याचेही काही तरी कारण असलेच पाहिजे. परमेश्वराने केवळ शून्यांतून ते निर्माण केले हे म्हणणे अशास्त्र आहे. तेव्हां या अडचणींतून पार पडण्याकरितां परमेश्वरच सृष्टिरूप झाला असें कबूल करण्यावांचून दुसरे गत्यंतर आपणास नाही, असो.
 आतां येथें मजा अशी झाली की आड चुकविण्याकरितां आपण उडी मारली आणि विहिरीत पडलों. एक अडचण ज्या युक्तीने आपण दूर केली त्याच युक्तीमुळे दुसरी अडचण उत्पन्न झाली. परमेश्वर म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर सांपडण्यासाठी आपण अनेक धर्मग्रंथ चाळले आणि अनेक पंथांचा व मतांचा तपास केला तर सर्वांस सामान्यपणे कबूल असा एक सिद्धांत आपणास आढळून येतो. ईश्वर म्हणजे बदलण्यास पात्र नाही असे स्वरूप, हा सिद्धांत सर्वांनी मान्य केला आहे. सर्व सृष्टीत बदलाबदल आणि घडामोड ही अखंड चालू असतांही ज्यांत काही बदल होणे शक्य नाहीं तो परमेश्वर. अत्यंत पुरातन कालापासून या कल्पनेचा इतिहास आपण चाळून