पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

घेऊ. ते आपल्या रोजच्या परिचयांतले आहे. फूल पाहिले नाही असा मनुष्यप्राणी आपणास आढळावयाचा नाहीं; तथापि कोणत्याही एका फुलाचे झाडून सारे गुणधर्म मला ठाऊक आहेत असे छातीवर हात ठेवून कोण म्हणूं शकेल ? त्या एका फुलाचीसुद्धा सर्वांगी परिपूर्ण माहिती करून घेणे आपणास शक्य नाही. काय चमत्कार पहा ! सृष्टिनियमांनी पूर्ण जखडलेलें तें फूल पाहता पाहता आपल्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन अदृश्य झालें-अनंतांत त्याचा लय झाला. आरंभी तें सान्त होतें-बद्ध होते; पण अखेरीस तें अनंतमुक्त-झाले. एका वाळूच्या कणाचीही स्थिति हीच आहे. त्या कणाचे पृथकरण करू लागा. त्यांतील सारे घटक शोधून काढून त्याची अखेरची वासलात आपण लावू शकू असें आरंभी आपणास वाटत असते; पण अखेरीस आपल्या भ्रमाचा भोंपळा फुटतो. तो कण अनंत आहे असे आपल्या अनुभवास येते. पण हा अनुभव येईपर्यंत तें सान्त आहे, आणि त्याचे घटक निश्चित आहेत असेंच आपणास वाटत असते. अशाच रीतीने साऱ्या वस्तू सान्त आहेत असे आपणास वाटत असतें.
 हा जडसृष्टीतील नियम आपल्या अंतःसृष्टीसही लागू आहे. आपले मानसिक विचार आणि अनुभव हे असेच सान्त आहेत या भरंवशाने आपण वागत असतो. एखाद्या क्षुद्रशा भासणाऱ्या विचाराचा पाठलाग आपण करूं लागलों तर अखेरीस तोसुद्धा आपल्या हाती लागत नाही. अनंतांत तो केव्हां आणि कसा गडप होतो हे आपणास समजतही नाही. पाहता पाहतां आपली दृष्टि तो चुकवितो आणि अनंताच्या अथांग गुहेत बुडी देतो. आपण आपले स्वतःचेच उदाहरण घेऊ. आपल्या अत्यंत परिचयाची अशी वस्तु कोणती असेल तर ती आपण स्वतःच; पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल तरी अगदी निश्चित अशी माहिती आपणास काय आहे ? आपले अस्तित्व आहे अशी पूर्ण जाणीव आपणांस असते. सृष्टिनियमांनी जखडून टाकलेलें असें आपलें स्वरूप आहे हे आपण जाणत असतो. काही काळ आपण जगतो आणि अखेरीस मरून जातो. आपल्या दृष्टीचे क्षितिज फार कोते आहे. आपल्याभोंवतीं सर्व दिशांनी विश्व पसरले आहे; आणि त्यांत आपण बांधले गेलो आहों. काही विशिष्ट कारणसमुच्चयाने आपला देहबंध निर्माण झाला आहे; पण कोणत्या क्षणी त्याची विघटना होईल