पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] एक उघडे रहस्य. ३

हे आपणास सांगवत नाही. या सर्व गोष्टी आपल्या पक्क्या ओळखीच्या आहेत. आपलें सामर्थ्य किती कोतें आहे पहा! आपल्या इच्छाशक्तीला पदोपदी आघात होतात. क्षणोक्षणी तिचे सामर्थ्य कुंठित होते. हजारों गोष्टी करण्याची हांव आपल्या चित्तांत असते; पण त्यांपैकी आपल्या हातून कितीशा गोष्टी पार पडतात ? आपली इच्छा स्वैरपणे वावरत असते. तिच्या गतीला जणूं कांहींच अडथळा नाही. प्रत्येक वस्तु आपणास हवीशी वाटते. आकाशांत चमकणाऱ्या ताऱ्यावर जाऊन राहावें असेंही आपणास वाटतें; पण या साऱ्या इच्छांपैकी कितीशा तृप्त होतात ? आपल्या इच्छातृप्तीच्या आड आपले शरीर येत असते. आपल्या साऱ्या इच्छा तृप्त होऊ नयेत अशी सृष्टीचीच इच्छा असते. आपलें दौर्बल्य आपल्या आड येत असते. रेतीच्या एखाद्या कणाचा अथवा एखाद्या फुलाचा पुरा थांग ज्याप्रमाणे आपणास कधींच लागत नाही, अथवा ज्याप्रमाणे हे जड जग अखेरपर्यंत आपणास कोडेच राहते, त्याचप्रमाणे आपण स्वतःही आपणास कोडेच आहों; किंबहुना या बाह्य जगाचा शोधही एक वेळ आपणास लागेल, पण आपलाच शोध लावणे आपणास त्याहून शतपट अधिक दुस्तर आहे. आपण स्वतः सान्त की अनंत या प्रश्नाचे निश्चित उत्तर आपणास अद्यापि देतां आलें नाही. वास्तविक आपण सान्त आहों आणि अनंतही आहों. समुद्राच्या लाटांसारखे आपण आहों. समुद्राची लाट म्हणजे समुद्राच्या रूपाची असतांही त्यापासून भिन्न असते. लाट या रूपाने ती भिन्न असते, तथापि तीही समुद्राचाच एक भाग असते. म्हणजे ती समुद्र आहे हेही खरे आणि ती समुद्र नाहीं हेही खरें. हा समुद्र नाही असें त्या लाटेच्या कोणत्याही अंशाबद्दल आपणास म्हणतां यावयाचें नाहीं. ' समुद्र ' हे नांव त्या लाटेला आणि समुद्राच्या दुसऱ्या कोणत्याही भागाला सारखेंच लागू पडते. आणि असें असतांही ' लाट ' या दृष्टीने तिचे अस्तित्व समुद्रापासून वेगळे असते. अशाच रीतीने अनंत अस्तित्वाच्या महासागरावरील लाटा आपण आहों. त्या सागरावरील क्षुद्रतरंग आपण आहों. या दृष्टीने आपण सान्त आहों; 'पण आपला स्वतःचा अंत पाहण्यासाठी आपण धडपडूं लागलों की आपलें अनंतत्व प्रत्ययास येते आणि आपला अंत आपणास लागेनासा होतो.
 आपलें जीवित जणुं काय स्वप्नवत् आहे. स्वप्नांतल्या मनाला स्वप्नही