पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत. ६३

याच मातीला निराळा आकार आला म्हणजे तिलाच आपण मडके म्हणू लागतो. या उदाहरणांत माती हे कारण आणि मडके हे त्या कारणाचे कार्य झाले. येथे कारणच रूपांतराने कार्य झालें ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत आली असेलच. कारण आणि कार्य यांच्या व्याख्या याहून वेगळ्या रीतीने करणे आपणास शक्यच नाही. अशाच रीतीनें मूळ प्रकृतीची रूपांतरें होत होत तीतून सारे विश्व निर्माण झाले आहे. आतां ज्या अर्थी कारण आणि कार्य ही मूलतः एकरूप असतात, त्या अर्थी विश्व आणि प्रकृति यांच्यांतही वास्तविक कोणताच भेद असण्याचे कारण नाही. अव्यक्त प्रकृतीपासून तो विचार अथवा मन येथपर्यंत जी अनेक रूपे आहेत, त्यांत खरा भोक्ता अथवा प्रकाशक या स्वरूपाचे एकही रूप नाही. ज्याप्रमाणे मातीचा गोळा शुद्ध जडरूप आहे त्याचप्रमाणे मनही जडरूपच आहे. केवळ या स्वरूपाचा विचार करतां त्यांत प्रकाश आढळत नाही. तें सूक्ष्म असले तरी जड आहे. ते स्वयंप्रकाश अथवा प्रकाशक नाही. असें आहे तथापि तें विचार करते आणि प्रत्येक वस्तूचा तारतम्य भाव तें शोधीत असते असाही अनुभव आपणास आहेच. जर ते केवळ जडरूप असेल तर ते विचार करू शकणार नाही. याकरितां महत् आणि अस्मिता अथवा जाणीव इत्यादिकांच्या द्वारे त्याच्यांतून जिचा प्रकाश प्रकाशतो अशी काही वस्तु असली पाहिजे हे उघड आहे. आणि याच वस्तूला कपिलांनी पुरुष अशी संज्ञा दिली आहे. यालाच वेदान्त 'आत्मा' या नावाने ओळखतो. पुरुष ही स्वयमेव वस्तु आहे. कोणत्याही दोन अथवा अधिक पदार्थाच्या मिश्रणाने ती निर्माण झाली नाही असे कपिल सांगतात. पुरुष जडरूप नाही. अजड वस्तु कांहीं असेल तर ती पुरुषच होय. त्याच्याशिवाय वाकीचे वस्तुजात जड आहे. माझ्यासमोर हा काळा फळा आहे. हा फळा मी पाहतो. ही पाहण्याची क्रिया कशी घडते? प्रथम माझे बाह्यडोळे काही आकाराची जाणीव अंतरिंद्रियांकडे आणतात. अंतरिद्रियांतून तिची रवानगी मनाकडे होते. या मनावर त्या आकाराचा ठसा उमटतो. हा ठसा मन बुद्धीकडे पाठवितें. बुद्धि झाली तरी तिला स्वयंस्फूर्ति नाही. तिला स्फूर्ति देण्याचे कार्य तिच्यामागे असलेला पुरुष करतो. या साऱ्या वस्तू जणू काय पुरुषाचे नोकर आहेत. बाहेरून आलेलें गांठोडे मालकाकडे नेऊन पोहोचवावें इतकेंच या चाकरांचे काम आहे. अशा रीतीने