पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

एखादं गांठोडे येऊन पडलें म्हणजे त्याची वासलात लावण्याचे काम मालक करतो. त्यासंबंधी कांहीं फर्माने सोडावयाची असली, अथवा त्या गांठोड्यांतील काही वस्तूंचा उपभोग घ्यावयाचा असला तर ही कामें मालक करतो. गांठोडे येण्याच्या या बाह्यक्रियेला प्रतिक्रिया करण्याचे काम मालकाचे आहे. याकरितांच याला द्रष्टा, भर्ता, भोक्ता इत्यादि नांवें श्रीकपिलांनी दिली आहेत. हा द्रष्टा सत्यपदी आरूढ झालेला राजाच होय. याचे स्वरूप मात्र अजड आहे. जाड्याचा अंशही त्याच्या ठिकाणी नाही. सद्रूप वस्तु म्हटली तर एवढीच. तो सद्रूप आणि अजड आहे म्हणूनच तो अनंत आणि सर्वव्यापी असला पाहिजे. ज्या अर्थी तो स्वयंभू आहे, त्या अर्थी दुसऱ्या कोणत्याही पदार्थानें तो मर्यादित होणे शक्य नाही. कपिलांच्या मताप्रमाणे प्रत्येक पुरुष अशा रीतीने अमर्याद आहे. प्रत्येक पुरुष सर्वव्यापी आहे. आपणांपैकी प्रत्येक सर्वव्यापी आहे; पण आपल्या क्रिया घडावयाच्या त्या मात्र लिंगदेहाने मर्यादित आहेत. लिंगदेहावांचून आपल्या क्रिया घडावयाच्या नाहीत. मन, बुद्धि, अहंकार आणि अंतरिंद्रिये इतकी मिळून लिंगदेह बनतो. याच शरिराला मोक्ष मिळावयाचा असतो, अथवा याच देहाला यमयातनांची प्राप्ति व्हावयाची असते. याच देहाला स्वर्गवास मिळून देवाचा जन्म येतो अथवा हाच देह अधःपतनाने पशुयोनीस जातो. मनुष्ययोनीत पुनःपुन्हा जन्म घेणारा देह हाच. पुरुषाला जन्म नाही आणि मृत्युही नाही, याचा विचार आपण केलाच आहे. पुरुष कोठे जात नाहीं आणि कोठून येतही नाही. हालचाल अथवा गति म्हणजे एका स्थलाहून दुसऱ्या स्थली जाणे. पुरुष अशा रीतीने एका जाग्यांतून दुसऱ्या जागी जात येत असेल तर तो सर्वव्यापी होऊ शकणार नाहीं; तसेंच तो अमर्यादही असूं शकणार नाहीं; आणि पुरुष सर्वव्यापी व अमर्याद आहे हे आपण पूर्वी पाहिलेच आहे. याकरितां त्याला गमनागमन आणि जन्ममरण असणे शक्य नाही.

 पुरुष सर्वव्यापी आहे, तो अमर्याद आहे, अनंत आहे आणि तोच एक स्वयंभू वस्तु आहे असे येथवर झालेल्या विवेचनावरून कपिलांचे मत असल्याचे तुमच्या लक्ष्यात आले असेलच. पुरुष ही एकच वस्तु प्रकृतीच्या मर्यादेबाहेरची आहे, पण बाह्यतः ती प्रकृतिबद्ध असल्यासारखे दिसतें हेही कपि-