पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

धारानेच चालते, आणि मन अथवा अंतरिंद्रियें प्राणांवर क्रिया करीत असतात. येथवर सांख्यशास्त्राने केलेले वर्णन सर्वस्वी सयुक्तिक आहे. येथवर सूक्ष्मेंद्रियांच्या ज्या क्रिया सांख्यशास्त्राने वर्णन केल्या आहेत, त्या अगदी विवेचकबुद्धीस अनुसरून असून तर्कशास्त्रासही संमत अशा आहेत. या बाबींत सांख्यशास्त्राने कसल्याही प्रकारचा बोबडेपणा ठेवला नसून सर्व विवेचन अगदी मुद्देसूद आणि रेखीव असें केले आहे. सांख्यशास्त्र हे जगांतलें प्राचीनतम सूक्ष्मेंद्रियशास्त्र आहे ही गोष्ट मनांत आली म्हणजे साहजिकपणे आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो. तत्त्वज्ञानाचा अथवा बुद्धिवादाचा उगम जगांत जेथे जेथे झाला आहे, तेथे तेथें श्रीकपिलांचे शास्त्र अंशतः तरी दृष्टीस पडल्यावांचून राहावयाचें नाही. जगांतील प्रत्येक पंडित या दृष्टीने कपिलांचा ऋणी आहे. पायथागोरासने या ज्ञानाचा अभ्यास हिंदुस्थानांत केला आणि त्याचा फैलाव त्याने ग्रीस देशांत केला. यानंतर याच ज्ञानाचा अंश प्लेटोला प्राप्त झाला. पुढे ईश्वरवाद्यांनी हे ज्ञान आलेक्झांड्रियांत नेलें; आणि अलेक्झांड्रियांतून त्याचा प्रसार युरोपांत झाला. अशा रीतीने तत्त्वविचार जेथे जेथें प्रचलित झाला आहे, तेथे तेथे या आदिदर्शनकाराचे ऋण आहे असे म्हणावयास हरकत नाही.

 कपिलकृत दर्शनाचा जो विचार आपण येथवर केला, त्यावरून त्यांचे शास्त्र सुसंगत आहे असे म्हणावयास हरकत नाही; पण आता यापुढे मात्र त्यांच्याशी आपला मतभेद होणार आहे. याच विचारसरणीच्या मार्गाने आपण पुढे पाऊल टाकू लागलों म्हणजे आपल्या मतभेदास सुरवात होणार आहे. श्रीकपिलांच्या दर्शनाचा मुख्य पाया म्हटला म्हणजे उत्क्रांति हा आहे. एका पदार्थाचे उत्क्रमण होऊन त्यांतून दुसरा पदार्थ निर्माण होतो, या मूलभूत सिद्धांताच्या पायावर आपल्या शास्त्राची उभारणी कपिलांनी केली आहे. 'कारण' या शब्दाची जी व्याख्या त्यांनी केली आहे, तीवरून सुद्धा माझ्या या म्हणण्याचे प्रत्यंतर आपणांस दिसेल. ते म्हणतात "कारण म्हणजे जें रूपांतराने आकार बदलून कार्यरूप घेतें तें." विश्वरचनेचे जे वर्णन त्यांनी केले आहे त्यावरूनही याच म्हणण्याला पुष्टि मिळते. एकाच वस्तूची रूपांतरे होत होत सारे विश्व स्पष्टत्वास कसे आले, याचा विचार आपण पूर्वी केलाच आहे तो ध्यानांत आणा. आपल्यासमोर आपणास माती दिसत असते.