पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.] सांख्य आणि वेदांत. ६१

अथवा धर्म आहेत असे नाही. या तीन तत्त्वांतून सर्व विश्व निर्माण झाले आहे. कल्पारंभी ही तीन तत्त्वे साम्यावस्थेत होती. त्यानंतर सृष्टि स्पष्टत्वास येण्यास आरंभ झाला तेव्हां या साम्यावस्थेत बिघाड होऊन या तत्त्वांची सरमिसळ एकमेकांत होऊ लागली, आणि अशा रीतीने हे सारे विश्व प्रतीत झाले. या स्पष्टावस्थेत जे तत्त्व प्रथम निर्माण झाले त्याला महत् असें नांव सांख्यशास्त्राने दिले आहे. महत् म्हणजे बुद्धि. महत् या तत्त्वांतून जाणीव निर्माण झाली. जाणिवेंतून मनाची उत्पत्ति झाली, व तींतूनच इंद्रियेही उद्भवली. पुढे तन्मात्रे झाली. तन्मात्रे म्हणजे शब्दस्पर्शादिकांचे अणू. सर्व अणू जाणिवेतूनच स्पष्टत्वास आले आहेत; आणि या अणूंच्या संघाताने सारे जड विश्व निर्माण झाले आहे. तन्मात्रांचे स्वरूप नेत्रांनी दिसण्यासारखें नाही, अथवा आपणास त्यांना स्पर्शही करता येत नाही; पण त्यांचे रूपांतर होऊन त्यांतून अणू बनले म्हणजे इंद्रियद्वारा त्यांचा अनुभव आपणास होऊ शकतो.

 मन, बुद्धि आणि अहंकार अशा तीन प्रकारच्या स्वरूपांनी युक्त असलेल्या चित्तापासून प्राणशक्तीची उत्पत्ति होते. प्राण म्हणजे श्वासोच्छ्वास या कल्पनेला आपल्या डोक्यांतून तुम्ही प्रथम हद्दपार करा. श्वासोच्छ्वास हा प्राणशक्तीचें एक दृश्य अथवा स्पष्ट स्वरूप मात्र आहे. ज्या चैतन्याच्या जोरावर सर्व शरिराची हालचाल होते आणि ज्याच्यायोगें सर्व अवयव एकसूत्रबद्ध होऊन आपापली कर्मे योग्यपणे करतात, त्या चैतन्याची जी कार्यकारी शक्ति तिचें नांव प्राण. आदिशक्ति कार्यकारी होऊन शरिराची हालचाल करूं लागली म्हणजे तिला प्राण अशी संज्ञा प्राप्त होते. हीच शक्ति विचार या रूपानेही प्रकट होते. सर्वांत अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचे असें प्राणाचे रूप म्हटले म्हणजे श्वासोच्छ्वास हे आहे. प्राणाचे संस्कार वायूवर घडून ही क्रिया सुरू होते. प्राणावर वायूची क्रिया होत नाही हे ध्यानांत ठेवण्यासारखे आहे. श्वासोवासांचे नियमन करणे ह्यास प्राणायाम असें म्हणतात. प्राणशक्तीच्या क्रिया ताब्यात आणण्याकरितां प्राणायामाचा अभ्यास योगी करतात. केवळ श्वासोश्वास ताब्यात आणण्याकरितां अथवा फुप्फुसे बळकट करण्याकरितांच प्राणायाम करावयाचा नसून त्यांत अधिक उच्च हेतूकडे लक्ष्य ठेवले पाहिजे. सर्व शरिराची क्रिया या प्राणांच्या आ-