पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

चकबुद्धीस शक्य दिसत नसल्यामुळे या एका बाबींत मात्र सांख्यमताशी आमचा विरोध आहे. या प्रश्नांना अधिक चांगले आणि समाधानकारक उत्तर आपण शोधू लागलों म्हणजे आपण अद्वैतापर्यंत येऊन पोहोचतों. प्रकृति आणि पुरुष ही दोन अनंतरूपें कशी असू शकतील ? या बाबींत सांख्यशास्त्र अपूर्ण राहिले आहे असे म्हणणे आम्हांस भाग आहे. त्यांच्या या उत्तराने आमचे पूर्ण समाधान होत नाही. येथपासून पुढे वेदान्ताने आपला मार्ग चाचपडत पुढे कसा काढला आणि सांख्यशास्त्रांत राहिलेले न्यून त्याने पूर्ण कसे केले याचा विचार आपण पुढे मागे लवकरच करूं; पण वेदान्ताने हे शास्त्र पूर्णतेस नेले असले तरी पहिल्या मानाची जागा सांख्यशास्त्रालाच देणे भाग आहे. या मार्गात सांख्यशास्त्राने जी बिनमोल कामगिरी बजावली आहे, तिचे महत्त्व कमी होत नाही हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. इमारत एकदां पूर्ण झाली म्हणजे तीवर अखेरचा एखादा हात फिरवून ती अधिक शोभायमान करणे हे काम फारसे अवघड नाही.

सांख्य आणि वेदान्त.

 सांख्यशास्त्राच्या विचारसरणीत उणीव कोठे आहे आणि तिची पूर्तता वेदान्तानें कशी केली आहे याचा विचार आज आपण करणार आहों; पण या आजच्या विषयास आरंभ करण्यापूर्वी सांख्यशास्त्राच्या मुख्य मुद्यांचे पर्यालोचन थोडक्यांत करणे वावगे होणार नाही. प्रकृति ही या साऱ्या दृश्य विश्वाचे कारण आहे असे सांख्यशास्त्राचे मत असल्याचे तुमच्या लक्ष्यांत असेलच. विचार, बुद्धि, विवेचकवुद्धि, प्रेम, द्वेष, इत्यादि भावना आणि तसेंच स्पर्श, रूप, रस आणि जड वस्तु ही प्रकृतींतून निर्माण झालेली आहेत असें सांख्य मत आहे. सृष्टीतील यच्चयावत् वस्तु प्रकृतीतून निर्माण झालेली आहे. ही प्रकृति त्रितत्त्वात्मक असून त्यांची नांवें सत्व, रज आणि तम अशी आहेत. सत्व, रज आणि तम ही तीन मूलतत्त्वे आहेत. हे तीन गुण