पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्यविचार. ५९

प्रत्येकी एक पुरुष आहे. अशाच रीतीनें तो वस्तुमात्रांत आहे. अनंत वर्तुळे एकमेकांशी संलग्न अशा स्थितीत असावी त्याप्रमाणे अनेक पुरुष या साऱ्या विश्वांत भरून राहिले आहेत, असें सांख्यांचे मत आहे. पुरुष हा मन नाहीं अथवा जड पदार्थही नाही. आपल्या जाणिवेच्या मर्यादेंत जें कांहीं येऊ शकतें तें त्याचे परावर्तितरूप मात्र होय. तो सर्वव्यापी असल्यामुळे त्याला जन्ममृत्यु असणे शक्य नाही. प्रकृतीची छाया त्याजवर पडते आणि जन्म व मृत्यु ही या छायेचींच रूपांतर होत; पण त्यांचा लेप पुरुषास लागू शकत नाही. तो स्वभावतःच अलेप्य आहे. सांख्यशास्त्राच्या मतांचें जें विवरण येथवर केले त्यावरून त्याची विचारसरणी किती शुद्ध, गंभीर आणि विवेकपूर्ण आहे हे पाहून मन आश्चर्याने थक्क होऊन जाते.

 आतां सांख्यशास्त्राच्या या मतांत विरोधी असा भाग कोणता आहे याचाही थोडक्यांत विचार करूं. आतापर्यंत जे विवेचन केले त्यांत या शास्त्राच्या विचारसरणींत नांव ठेवण्याजोगें स्थळ आढळत नाही. विवेचकबुद्धीस असंमत असें त्याने कांहींच सांगितले नाही. सूक्ष्मेंद्रियांचा त्याने केलेला विचार परिपूर्ण आणि अभेद्य आहे. सूक्ष्मेंद्रियशास्त्राचे त्याचे सिद्धांत आपणास उलथून पाडता येत नाहीत. गोलक आणि बाह्यसाधने असे इंद्रियांचे दोन भाग सांख्यशास्त्राने सांगितले आहेत, यावरूनच इंद्रियें स्वयंभू स्वरूपाची नसून ती संघटित रूपाची आहेत असे सिद्ध होते. त्याचप्रमाणे अहंकारांतही जाणीव आणि जड वस्तु असे दोन भाग आहेत. यामुळे तोही स्वयंभू नसून दोन वस्तूंचा संघात आहे हे आपल्या लक्ष्यांत येईलच. तसेंच महत् हे तत्त्वही आदिरूप नाही. महत् हे जड वस्तूचे सूक्ष्मरूप आहे. या सर्वांच्या पाठीमागे गेल्यानंतर पुरुषाचे दर्शन आपणास होते. येथवर सांख्यशास्त्राविरुद्ध एकही आक्षेप आपणास घेतां येणे शक्य दिसत नाही; पण " प्रकृति कोणी निर्माण केली " असा प्रश्न जर आपण सांख्यशास्त्राला विचारला तर पुरुष आणि प्रकृति ही दोन्ही अनादि असून सर्वव्यापी आहेत असे उत्तर तें देईल. त्याचप्रमाणे पुरुष एकच नसून असंख्य आहेत असेंही तें म्हणेल. या उत्तराने मात्र आमचे समाधान न होता त्यावर आक्षेप घेतल्यावांचून आमच्याने राहवत नाही. अनंत अनेक असणे शक्य आहे काय,असा प्रश्न आमच्या मनांत उभा राहतो आणि अशी गोष्ट आमच्या विवे-