पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.] सांख्यविचार. ५३

आपणास उपलब्ध असल्यामुळे ही ताडून पाहण्यास व गुणधर्माचें साम्य पाहण्यास आपणास अवसरच नाही. आपली ईश्वरविषयक कल्पनाही अशाच प्रकारची आहे. परमेश्वराचे संपूर्ण स्वरूप आपल्या बुद्धीच्या अवलोकनांत कधीच येत नाही. त्याचा अल्पसा अंश मात्र आपण पाहूं शकतो. ज्याप्रमाणे या साऱ्या विश्वाचे रूप साकल्याने आपणास पाहतां येत नाही, त्याचप्रमाणे परमेश्वराचेही सारें रूप आपल्या अवलोकनांत येत नाही. या अल्पशा अंशापलीकडे उरलेला मोठा भाग मानवीबुद्धीच्या क्षेत्राबाहेरचा आहे. त्या क्षेत्राच्या आंत तो येऊ शकत नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. त्याचे स्वरूप इतके विस्तृत आहे की हे सारे विश्वही त्याचा केवळ लहानसा अंश आहे. त्याच्या स्वरूपाचा विस्तार इतका मोठा असल्यामुळेच आपल्या अवलोकनांत तो येत नाही, आणि अल्पसा अंश आपल्या दृष्टीस पडत असल्यामुळेच परमेश्वर अपूर्णसा आपणास भासतो. यामुळेच परमात्मरूपाची खरी कल्पना आपणास होत नाही आणि त्याच्या स्वरूपाबद्दल अनेक प्रकारचा गैरसमज आपल्या डोक्यांत असतो. विश्वाचे कोडे आपणास उलगडावयाचें असेल आणि परमेश्वराचे खरे स्वरूप पाहावयाचे असेल तर विवेचकबुद्धीच्या आणि जाणिवेच्याही पलीकडे आपणास गेले पाहिजे. " श्रोतव्य आणि श्रुत या दोहोंच्यापलीकडे तूं जा. विवेचकबुद्धि आणि विचार या दोहोंसही तूं मागे टाक, म्हणजे तूं सत्यवस्तूला पोहोंचशील. तूं श्रुतींच्याही पलीकडे जा; कारण श्रुती त्रिगुणांचे ज्ञान मात्र सांगतात. त्रिगुणापलीकडे श्रुती मौन पावल्या आहेत; याकरितां तूं त्यांच्यापलीकडे जाऊन त्रिगुणातीत हो, " असा भगवान् श्रीकृष्णांचा उपदेश आहे. त्रिगुणांच्या मर्यादेच्या आंत राहून विश्वाच्या कोड्याचा अथवा परमात्मरूपाचा अंत लागावयाचा नाही. हा अंत लावावयाचा असेल तर ही मर्यादा उल्लंघूनच गेले पाहिजे. आपण त्रिगुणांच्या मर्यादेच्या आंत आहों तोपर्यंत विश्वाच्या सामरस्याचा आणि एकतानतेचा अनुभव आपणास यावयाचा नाही. तोपर्यंत विश्व ही काही तरी बेताल आणि फापट पसाऱ्याची वस्तु आहे असेंच आपणास वाटणार.
 पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना एकाच पद्धतीने झाली आहे. या दोहोंच्या पोटी तीच तत्त्वे आहेत आणि त्यांची रचनापद्धतही तीच आहे. पिंडरचनेत जाणिवेच्या तिन्ही अंगांचा अनुभव आपणास नसतो. त्या तिहीं-