पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

घ्या. हा खडा गारगोटीचा आहे हे निश्चित करण्यास तसल्याच जातीचे दुसरे अनेक खडे पाहून त्यांच्याशी त्या खड्याची तुलना करणे तुम्हांस भाग आहे. आता हाच सिद्धांत आपल्या विश्वनिरीक्षणास लावून पाहूं. विश्व म्हणजे काय असा प्रश्न आपल्या चित्तांत उपस्थित झाला असता त्याच्या जातीची दुसरी अनेक विश्वे पाहूनच त्याचा निश्चय आपणास करता येईल; पण ही गोष्ट करणे आपणास शक्यच नाहीं; कारण आपल्या मनाच्या कपाटांत विश्व या नांवाची एकच वस्तु आहे, आणि तिच्याशी तुलना करण्यास तिच्या जातीची दुसरी वस्तूच आपणापाशी नाही. यामुळे अशा प्रकारची तुलना करणे आपणास अशक्य होते. आपल्या मनाच्या खणाच्या लहानशा अवकाशांत विश्वाचा एक अत्यल्प अंश मात्र राहू शकतो, आणि तुलना करण्यास त्याच्याशी सदृश असें कांहींच आपणास आढळत नाही. यामुळे विश्व म्हणजे काय याचा उलगडा अद्यापि आपणास झाला नाही आणि असा उलगडा न झाल्यामुळे हे कोडे सोडविण्यासाठी आपले मन एकसारखें धडपड करीत राहिले आहे. आपल्या बुद्धीला अद्यापि या बाबतींत समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे चिडून जाऊन “ हे जग मोठे दुष्ट आहे, भयंकर आहे, वाईट आहे अशा गोष्टी ती आपणास सांगत असते; पण कधी काळी तिची तशी लहर फिरली तर जग चांगले आहे असेंही ती म्हणेल. तथापि एकंदरीने पाहतां जग अपूर्णावस्थेत आहे हा तिचा समज मात्र पक्का आहे. जगाचे खरे स्वरूप आपणास जाणावयाचे असेल तर त्याच्याशी सदृश असल्या दुसऱ्या जगपरंपरा आपण अवलोकनांत आणल्या पाहिजेत. असे झाले तरच जग म्हणजे काय याचे यथातथ्य ज्ञान आपणास होणार आहे; आणि दुसऱ्या जगपरंपरा आपणास पाहावयाच्या असतील तर या जगांत राहून ते घडणे शक्य नाही. त्याकरितां या जगापलीकडे, या विश्वापलीकडे, या जाणिवेपलीकडे आपणास गेले पाहिजे. त्या मुक्कामावर आपण पोहोंचलों म्हणजे सारे विश्व एकसमयावच्छेदें आपल्या डोळ्यांसमोर उभे राहील. या मुक्कामावर पोहोचण्याच्या अगोदर आपण कितीही धडपड केली आणि या विश्वाच्या कडक भिंतीवर आपली डोकी आपण कितीही आपटली तर रतिभरही उपयोग होणार नाही. कारण ज्ञान म्हणजे एकाच जातीच्या अनेक वस्तू ताडून पाहणे; आणि जग या जातीची एकच वस्तु