पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

तील फक्त एकच अंग आपल्या अनुभवास येत असते. विचाराक्षमता ( sub-consciousness ) आणि विचारातीतता ( super-con-sciousness) ही दोन्ही अंगे आपल्या सामान्य अनुभवाबाहेरची आहेत. आपला अनुभव सामान्य विचारापुरताच असतो. सामान्य विचारावस्था मात्र आपल्या ओळखीची आहे. “ मी पापी आहे " असे एखादा मनुष्य म्हणेल तर ते त्याचे म्हणणे सपशेल खोटें आहे; कारण त्याला स्वतःची पुरती ओळखच नाही. स्वतःचे ज्ञान सामग्र्याने त्याला झालेलेच नाही. मग स्वतःबद्दलचे त्याचे कोणतेही मत सर्वथैव खरें कसे असू शकेल ? तो अज्ञानांत बुडालेला आहे. स्वतःचा फक्त एकच भाग त्याला ठाऊक आहे. कारण त्याच्या ज्ञानाने कितीहि मोठी उडी मारली तरी जाणिवेच्या मधल्या म्हणजे विचारावस्थेपलीकडे तो जाऊंच शकत नाही. ज्या भूमीवर तो उभा आहे, तिचा एकच भाग त्याच्या अवलोकनांत येतो. मग अशा स्थितींत साऱ्या जमिनीबद्दल त्याने दिलेले मत खरें कसें असू शकेल ? हीच गोष्ट साऱ्या विश्वरचनेसही लागू आहे. विश्वांतील जेवढा भाग आपल्या विचारावस्थेत येऊ शकतो तेवढयाचेच ज्ञान आपणास होऊ शकते. सर्व विश्वाचे ज्ञान एकसमयावच्छेदें आपणास कधीच होत नाही. एका पिंडांत ज्याप्रमाणे बुद्धि ही विचाराक्षमता, विचारप्रवणता आणि विचारातीतता या तीन अवस्थांत प्रकट झालेली असते, त्याचप्रमाणे महत् तत्त्व तशाच प्रकारच्या तिन्ही अवस्थांत विश्वरूपांत प्रकट झाले आहे. विश्वांत ज्याप्रमाणे महत् तत्त्वापासून दुसरी अनेक तत्त्वे निघाली, त्याचप्रमाणे पिंडांत बुद्धितत्त्वापासून तीच तत्त्वे निघाली. ज्या अनुक्रमाने महत्तत्त्वाचे रूपांतर होत होत ब्रह्मांड प्रकट झाले त्याच अनुक्रमानें बुद्धितत्त्वांचे रूपांतर होत होत पिंड प्रकट झाला.
 मूळ प्रकृतींत ही रूपांतरें कशाने झाली ? ती कोणी घडवून आणली ? अथपासून इतीपर्यंत सारी प्रकृति केवळ जड आहे हे आपण पाहतोच. अनेक वस्तूंच्या संघाताने ती उत्पन्न झालेली असून ती चैतन्यात्मक नाही. नियम म्हणून जेथे दिसतो, तेथे त्या नियमाने बांधली जाणारी वस्तु अचेतन असलीच पाहिजे हे उघड आहे. नियमाला अथवा कायद्याला बाध आणण्याचे सामर्थ्य नसणे हा गुण फक्त जड म्हणजे चैतन्यविहीन वस्तूंच्या अंगी मात्र असतो. मन, बुद्धि, इच्छा आणि बाकीच्या साऱ्या वस्तू ह्याच चैत-