पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] मी काय शिकलों.२९३


 आतां याहूनहि वेगळा असा आणखी एक तिसरा वर्ग फार प्राचीनकाळा पासून आमच्या देशांत अस्तित्वात आहे. मला हे वादविवाद समजत नाहीत, ते समजण्याची माझी इच्छाहि नाही, इतकी डोकेफोड करून बुद्धीचा कीस पाडण्याची माझी इच्छा नाही, मला आत्मलाभ हवा, ज्या ठिकाणी या दृश्याचे वारे नाही, ज्या ठिकाणी सुख आणि दुःख ही दोन्ही नाहीत आणि ज्या ठिकाणी केवळ आनंदरूप मात्र आहे, अशा ठिकाणी मला जावयाचें आहे. गंगास्नान करून हे ठिकाण प्राप्त होईल, असें मी म्हणत नाही. शिवाची, रामाची अथवा विष्णूची पूजा करून हे ठिकाण मिळेल, असेंहि मला सांग वत नाही पण कोणाचीहि पूजा, तो एकच विश्वमूर्ति आहे, या एकनिष्ठभा वनेने केली, तर मोक्ष मिळेल, असे मला वाटते.' हा वर्ग आमच्या देशांत फार प्राचीनकाळापासून आहे, आणि मी स्वतः याच वर्गापैकी आहे,असें मी मोठ्या अभिमानाने म्हणतो. परमेश्वराची सेवा करावी, पण संसारहि सोडूं नये, असा उपदेश कांहीं लोक आम्हांस करीत असतात. पण हे लोक विचारवंत नसतात. आपण काय बोलतो, हे त्यांस कळत नाही. जी गोष्ट ते तोंडाने बोलत असतात, तिला त्याच्याच अंतःकरणाची ग्वाही नसते. ज्या ठिकाणी राम आहे तेथे काम नाही, असे आपले जुने महात्मे म्हणत असत. राम आणि काम यांचा वास एकत्र असू शकत नाही. जेथें काम आहे तेथे राम येणार नाही; आणि राम आल्यावर काम राहूं शकणार नाही. कामकां चनाचा पूर्ण त्याग केल्याशिवाय परमात्मलाभ होऊ शकणार नाही, असें आमच्या जुन्या सत्पुरुषांनी तार स्वराने ओरडून सांगितले आहे. हा सारा संसार मिथ्या आहे. तो पाण्याच्या बुडबुड्यासारखा पोकळ आहे. त्याच्या आंत कांहीं सत्त्व शोधू जाणे मूर्खपणाचे आहे. तो सोडून दिल्याशिवाय तुम्हीं कांहीं केलें, तरी आत्मलाभ तुम्हांस व्हावयाचा नाही. संसारावर लाथ मारण्याचे धैर्य तुमच्या अंगी नसेल, तर तसे स्पष्ट सांगा आणि आपला दुब ळेपणा कबूल करा. पण आपले ध्येय उच्चासनावरून ढळवू नका. सडक्या प्रेताला सोन्यामोत्यांच्या अलंकारांखाली झांकून टाकण्यांत काय मतलब आहे ? तुम्हांला परमेश्वर हवा असेल, तर हा लपंडावीचा खेळ बंद केल्या शिवाय गत्यंतर नाही. मी हे सोडणार नाही आणि तेंहि धरीन, असली तुमची असंभाव्य आकांक्षा कधीहि तृप्त व्हावयाची नाही. स्वतःच्याच