पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२९२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


स्थिति अत्यंत कष्टप्रद आहे आणि आपणांभोवती जडवादाचा घेरा चोहों कडून पडला आहे, हे खरे. तथापि अशा स्थितीतही स्वधर्मावद्दल इतकी उदासीनता असणे चांगले नव्हे. आमच्या या मातृभूमीत युरोपीय पद्धतीचे आचारविचार सर्वत्र फैलावून आमचा सारा संसार त्यांनी व्यापून टाकला आहे. अशा विपरीत अवस्थेत आमचें सारें आयुष्य काढणे आम्हांस भाग झाले आहे. पण असे असतांहि स्वधर्माचा विचार आपण अगदीच सोडून द्यावा, हे रास्त नव्हे.
 हिंदी राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाकरितां आपल्या धर्मात सुधारणा करावी अथवा खरे म्हणावयाचें तर तो सगळाच उलथापालथा करावा, असे कित्येक सुधारकांस अलीकडे वाटू लागले आहे. यांत कित्येक खरे विचारवंत गृहस्थ आहेत हे खरे. तथापि, पुष्कळसे शुद्ध आंधळे आहेत, हेहि खोटे नाही. स्वतः काही विचार न करितां डोळे मिटून दुसऱ्याच्या मागे ते जात असतात. आपण काय करीत आहों, याचेंहि भान त्यांस नसते. सुधारकांतील हा आ धळा वर्ग पाश्चात्यांच्या कल्पना आमच्या धर्मात घुसविण्यास अत्यंत उत्सुक झाला आहे. मूर्तिपूजा हा शब्द त्यांनी सध्या उराशी धरला आहे. हिंदु धर्मात मूर्तिपूजा असल्यामुळेच तो धर्म खरा नाही, असें हे बरळत सुटतात. पण मूर्तिपूजा हे प्रकरण तरी काय आहे, हे शोधून काढण्याची खटपट ते कधीच करीत नाहीत. मूर्तिपूजा खरोखर वाईट की चांगली आहे, हेहि त्यांस कळत नाही. पाश्चात्य लोक मूर्तिपूजा त्याज्य समजतात, म्हणून त्यांच्या तों डचा हा एक शब्द उचलून हेहि हिंदु धर्म खोटा आहे, अशी ओरड सुरू करितात. आतां आणखीहि एक वर्ग आपल्या लोकांत उत्पन्न झाला आहे. हंदुस्थानांतील प्रत्येक चालरीत व प्रत्येक आचारविचार शास्त्रदृष्ट्या समर्थ नीय आहे, असें हे म्हणतात. विद्युतशक्ति, आकर्षण, वातावरणाचे स्फंद आणि अशाच प्रकारचे दुसरे कांहीं शास्त्रीय शब्द उच्चारून कोणत्याही मूर्खपणाच्या चालीचे मंडन ते करितात. काय सांगावें ? परमेश्वर म्हणजे विद्युत्स्पंदांचा गोळा आहे, असेहि उद्या ते म्हणतील ! असो. परमेश्वर त्यांचेंहि कल्याण करो. नाना प्रकारच्या स्वभावविशेषांच्या द्वारे नाना युक्तींनी आणि अनेक हस्तांनी परमेश्वर आपला कार्यभाग करीत असतो. भले बुरे सारेच लोक

त्याचे हस्तक होत.