पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] संन्याशाचे ध्येय आणि त्याचा अभ्यास. २८९


असतांहि आपल्या नजरेसमोर उच्च साध्य असावें. उच्च साध्य आणि संसार या दोहोंचा एकत्र परिपाक करण्याचा यत्न तुम्ही करावा. एखाद्या क्षणी अचल ध्यानस्थ होण्याची जशी तुमच्या चित्ताची तयारी असावी त्याच प्रमाणे दुसऱ्या क्षणी शेतांत जाऊन नांगर धरण्याचीहि तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. एका क्षणीं विद्वत्ताप्रचुर शास्त्रार्थ चर्चा करीत असतां, दुसऱ्या क्षणी भाजीची टोपली डोक्यावर घेऊन बाजारांत घासाघीस घाल ण्याची तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. एके क्षणी अत्युच्च विचा रांत मन दंग होऊन एखाद्या पृथ्वीपतीसारखे जग तुच्छ करून तुम्ही बस लेले असतां दुसऱ्याच क्षणीं केराची टोपली उचलण्याची तुमच्या चित्ताची तयारी असली पाहिजे. मठांतल्या केराची टोपलीच नव्हे, तर कोणाच्याही घरची टोपली उचलण्यांत तुम्हांला कमीपणा वाटू नये.
 तुमच्या या मठाचा उद्देश पुरुषार्थी माणसें निर्माण करण्याचा आहे, हे विसरूं नका. पूर्वकालीन ऋषींनी लिहिलेल्या ग्रंथाचें अध्ययन करणे, एवढयाने तुमचा खरा कार्यभाग संपला असें नाही. ते ऋषि कालाच्या उदरांत नाहीसे झाले आणि त्यांजबरोबरच त्यांची मतेंहि अस्तंगत झाली. आतां ती जुनी मते नुसती पठण करण्यांत अर्थ नाही. त्या ऋषींनी काय म्हटले, हे पहात न बसतांना,तुम्ही स्वतःच ऋषि व्हा. पूर्वकालीन ऋषि महापुरुष होते हे खरें; पण तेहि मनुष्यच होते हेहि खरे आहे. आणि तुम्हीहि मनुष्येच आहां, मग त्यांचे ऋषिपण तुमचे अंगीं कां येऊं नये ? नुसत्या पुस्तकी विद्येनें कोणता कार्यभाग होणार ? फार काय, पण नुसत्या ध्यानानेंहि कांहीं कार्यभाग होणार नाही. मंत्रतंत्राचे नुसते पठणहि तसेंच निरुपयोगी आहे. या पुस्तकी विद्येच्या मागे न लागतां तुम्ही स्वतंत्र विचारवान् व्हा. बुद्धिमार्गातहि परावलंबी न होतां स्वावलंबी व्हा, पुरुषार्थी कसे व्हावें हे तुम्ही शिका. विश्वचालक शक्तीइतकें ज्याचे अंतःकरण शक्तिवान् असते, आणि त्याबरोबरच तेथे एखाद्या स्त्रीच्या अंतःकरणाची कोमलता असते, तोच खरा पुरुष होय.आपणाभोंवतीं पसरलेल्या कोट्यवधी जीवांपैकी प्रत्येक जीव तुम्हांस आत्मवत् वाटला पाहिजे; पण त्याबरो बरच एक रतिभरहि कंपायमान होणार नाही, असें तुमचे अंतःकरण असावें. या गोष्टी तुम्हांस परस्परविरोधी वाटतील, पण हा विरोधाभास तुमच्या ठिकाणी असल्याशिवाय तुम्ही पुरुषार्थी होऊ शकणार नाही. साऱ्या विश्वावर हुकमत

स्वा०वि० खं०-९-१९.