पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


नवा, कर्मठ, उदारमतवादी इत्यादि अनेक पंथांना आपली पुढील इमारत रचता येण्यासारखी आहे. आता यापुढे आणखीहि एक मुद्दा आपण विशेष ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. या मुद्याचा विसर आपणांस वारंवार पडत असतो ही मोट्या दुःखाची गोष्ट आहे. आणि याकरितांच त्याचें चर्वितच वणहि इष्ट आहे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हे तत्त्व आपण केव्हाही विसरू नये. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बाकीच्या साऱ्या गोष्टी फोल आहेत. अमुक गोष्टीवर विश्वास ठेविला म्हणजे सारा धर्म त्यांत आला असें नाहीं. पाश्चात्य धर्माची ही व्याख्या आम्हांस कधीहि मान्य होण्यासारखी नाही. जन्मादारभ्य ही व्याख्या आम्हांस कोणी पढविली नाही. 'नर करनी करे तो नरका नारायण होय ' हा सिद्धांत आमच्या बाल्यापासून आमच्या कानांवर आदळत आहे. आमचे जे काही स्वरूप आजमितीस आहे, ते आमच्या प्रत्यक्ष कृतीचें फल आहे. कांहीं सिद्धांतांवर आणि धर्ममतांवर नुसता विश्वास ठेवून तुमचे काम भागणार नाही. अशा विश्वा साची फारशी मदत तुम्हांस होणार नाही. अत्यंत प्राचीन काळी अनुभूती हा एकच शब्द आकाशवाणीने आम्हांस सांगितला आहे. अनुभवाशिवाय धर्म नाही हे वचन आमच्या धर्मग्रंथांशिवाय इतरत्र कोठे आढळावयाचें नाहीं. परमेश्वराची प्रत्यक्ष भेट घ्या असा उपदेश आमच्या धर्मग्रंथांशिवाय कोणीहि केलेला नाही. हे शब्द तुम्हांस कदाचित् फाजील धार्ष्ट्यचे वाटतील, पण त्यांत असत्याचा लेशहि नाही. ते अक्षरशः खरे आहेत, अशी दृढ श्रद्धा तुम्ही बाळगा. ते प्रत्यक्ष अनुभवाचे शब्द आहेत. त्यांतील प्रत्येक ध्वनि आणि प्रत्येक स्पंदहि खरा आहे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे. नुसतें श्रवण म्हणजे धर्म नव्हे. काही शब्द पाठ करून पोपटासारखे तोंडाने बड़ बडणे म्हणजेहि धर्म नव्हे. धर्म म्हणजे बुद्धिवाद नव्हे. या सर्ववस्तूंना खरोखर यत्किचितहि किंमत नाही. धर्माचा प्रवेश आपल्या अंतःकरणांत होऊन तेथे त्याचे प्रत्यक्ष दर्शनच झाले पाहिजे. आपल्या बुद्धीला पटतें म्हणून परमेश्वराचे अस्तित्व मानावयाचे, हे त्याच्या अस्तित्वाचे निश्चित प्रमाण नव्हे. परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन आपल्या पूर्वजांना झाले आणि असे दर्शन घेतलेले लोक आजच्या काळीहि अस्तित्वात आहेत, हेच त्याच्या अस्तित्वाचे खरें प्रमाण. आत्म्याला अस्तित्व आहे असे आपण मानतों; पण मानण्यावरून