पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


दित असू द्या. मी क:पदार्थ आहे हा विचार तुमच्या चित्ताला शिवतो तरी कसा ? सर्व तुम्हीच आहां; जगांतील सारी सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या अंगी आहे. याकरितां मी वाटेल ते करूं शकेन आणि वाटेल तें करण्याची माझी तयारी आहे असे चिंतन करीत चला. वाटेल तें करण्याची तयारी प्रत्येकानेंच केली पाहिजे, अशी दृढ आत्मश्रद्धा आपल्या पूर्वजांच्या अंगी होती. या आत्मश्रद्धेनेच नवीं नवीं कार्ये अंगिकारण्यास त्यांना उद्युक्त केले. या आत्म श्रद्धेमुळेच त्यांचा अधिकाधिक विश्वास होत गेला. हिंदु राष्ट्र एका काळी संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोचलें, याचे कारण आपल्या पूर्व जांची ही आत्मश्रद्धाच होय; आणि आतां तुह्मांस अवनती झाल्याचे दिसत असेल आणि तुमच्यांत कांहीं उणेपणा आल्याचा प्रत्यय तुम्हांस येत असेल, तर त्याचे कारण हा आत्मविश्वास तुमच्यांतून नष्ट झाला. ज्या दिवशी आत्म विश्वास नाहीसा झाला, त्याच दिवशी तुमच्या अवनतीचा पाया पडला हे माझे शब्द पक्के ध्यानांत धरा. आत्मविश्वासाचा अभाव हाच खरा नास्तिकपणा होय. ज्याचा विश्वास स्वतःच्या कर्तबगारीवर नाही आणि ज्याला स्वतः चाच भरंवसा वाटत नाही, त्याला परमेश्वराचा भरंवसा तरी कोठून वाट णार ? आपल्या हस्तादि इंद्रियांच्या द्वारें अनंत परमेश्वरच काय करीत आहे, असा भरंवसा तुमच्या चित्तांत उत्पन्न झाला आहे काय? हा अंत र्यामी, हा सर्वगामी परमात्मा प्रत्येक अणुरेणूंत ओतप्रोत भरून राहिला आहे आणि तोच माझ्या देहांत, मनांत, बुद्धीत आणि जीवात्म्यांत ओतप्रोत भरला आहे, असा विश्वास तुमच्या चित्तांत खरोखरच असेल तर निरा शेचा पगडा तुमच्या चित्तावर कां बसावा? मी अगदी क्षुद्र प्राणी असेन, महासागरावरील एखादा लहानसा तरंग मी असेन आणि तुम्ही प्रचंड लाट असाल; पण असे असले म्हणून काय झाले ? जो महासागर तुमच्या पाठीशी उभा आहे, तोच माझ्या पाठीशी हि नाही काय ? जे सर्वशक्तिमत्त्व तुमच्या ठिकाणी अधिक विस्तृत स्वरूपांत प्रकट झाले आहे, तेच माझ्या ठिकाणी बीजरूपाने तरी नाही काय? तुम्ही पर्वतासारखे विशाल असाल, तथापि ज्याच्या बळावर तुम्ही पर्वतप्राय बनला आहां, त्याच बळाशी माझाहि योग जन्मापासून झाला आहे. माझ्या ठिकाणी अस्तित्व आलें हीच त्या योगाची खूण आहे. जें सच्चिदानंद रूप तुमच्या पर्वतप्राय आकाराच्या मागे आहे,