पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.२६५


ज्ञानांत येथे मूलतःच भेद आहे. आत्मा स्वभावतः पवित्र आहे हा आमचा सिद्धांत असल्यामुळे आमची दृष्टि अर्थातच अंतर्वर्ती होते. जगांतील पावि त्र्याचा शोध आम्ही अंतःसृष्टीत शिरून करू लागलो. आम्ही पूजेला बसलों ह्मणजे आपले डोळे मिटतो. अंतर्मुख होऊन परमेश्वर शोधावा ही आमची नैसर्गिक प्रवृत्ति आहे. बाह्य सृष्टीपासून परावृत्त होऊन अंतर्मुखतेनें ध्यान केल्यास परमेश्वर आंतच कोठेतरी सांपडेल असें आह्मांस वाटते. उलटपक्षी पाश्चात्य भक्त परमेश्वराचा शोध करूं लागला ह्मणजे तो आकाशाकडे डोळे करतो. परमेश्वराने आपलें ज्ञान कोणाला तरी प्रकट होऊन सांगितले आणि त्यांतून आपली धर्मपुस्तकें निर्माण झाली असा पाश्चात्यांचा समज आहे. उलटपक्षी आमचे धर्मग्रंथ आमच्या मंत्रदृष्टयांच्या खोल हृदयांतून निर्माण झाले असे आम्ही समजतो.
 आतां सांगितलेला हा मुद्दा आपण विशेषेकरून ध्यानात ठेविला पाहिजे; एवढेच नव्हे, तर तो सर्वांच्या हृदयावर पक्का ठसविण्याचा अट्टाहास केला पाहिजे. मी स्वभावतःच परिपूर्ण निरामय आणि आनंदरूप आहे असे प्रत्ये काला वाटावयास लावणे, हीच आपली भविष्यकालाची कामगिरी होय. प्रियबंधूंनो! मी दुबळा, मी पापी असें ज्याला वाटते, त्या मनुष्यापासून कवडीचाहि लाभ त्याला अथवा जगाला होणार नाही, हे तुम्ही निश्चित समजा. या सिद्धांताबद्दल माझी बालंबाल खात्री झाली आहे आणि म्हणूनच त्याचें पुनःपुन्हां चर्वितचर्वण इतक्या तांतडीने मी तुम्हांपुढे करितो. हा सिद्धांत तुम्ही पक्का ध्यानांत धरा, त्याला अनुसरून आपली वागणूक ठेवा आणि दुसऱ्याच्या हृदयावरहि तो ठसविण्याची खटपट करा. मी पापी, मो दुःखी, मला काहीच किंमत नाही, असले विचार ज्याच्या चित्तांत रात्रंदिवस घोळ तात, त्याचे जीवित अखेरीस खरोखरच अर्थशून्य होऊन बसतें. मी सर्व शक्तिमान् आहे, असें चिंतन तुम्ही अहोरात्र कराल तर तुम्ही निःसंशय तसेच व्हाल; आणि याच्या उलट चिंतन तुम्ही केले तर तुम्ही अखेरीस शून्यप्राय व्हाल हेहि निश्चित आहे. हा महासिद्धांत कधीहि विसरू नका. तुमचे सारे जीवित या एकाच मुद्यावर अवलंबून आहे. आम्ही सर्वशक्ति मंताचे वारसदार आहों, आमच्या ठिकाणी अनंत अग्नीचा स्फुल्लिंग आहे आणि आम्ही यथाकाली स्वतः अनंतरूप होऊं, हेच ध्यान तुमच्या चित्ताला सदो- .