पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


मान्य आहे. कोणतेंहि मत अथवा पंथ याविरुद्ध बोलत नाही. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल मतवैचित्र्य असले तरी आत्मा नित्य आहे या मुद्याबद्दल वाद नाही. कित्येकांच्या मताप्रमाणे आत्मा आणि परमात्मा हे द्वैत कायमचे आहे, असे एखादा पंथ म्हणतो आणि तें तसें नाहीं असें दुसरा कोणी म्हणतो. आणखी कोणाच्या मते आत्मा परमात्म्याचाच अंश असतो. अशा प्रकारचे कितीहि मतवैचित्र्य असले, तथापि आत्मा स्थिर रूप आहे या मूलभूत सिद्धांताबद्दल आपणांत वाद नाही. आत्म्याला कोणी निर्माण केलें नाहीं, तो अनंत आहे, तो अमर आहे आणि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या देहांचा आश्रय करून अखेरीस तो स्थिररूप कायमचा रहातो, याबद्दल आपणांत मतभेद नाही.
 आतां यापुढे आमच्या पूर्वजांनी धर्मज्ञानाच्या बाबींत जो शोध लावला तो खरोखरच अत्यंत आश्चर्यजनक आणि अत्यंत उज्ज्वल रूपाचा आहे. या शोधाने धर्मज्ञानाची अखेर झाली असेंहि म्हटले तरी चालेल. पौर्वात्य तत्त्व ज्ञान आणि पाश्चात्य विचारसरणी यांत जो मोठा भेद आहे, तो तुमच्या लक्षात आलाच असेल. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना हा भेद मूलतःच आहे हे स्पष्ट कळून चुकले असेल. तो मेद असाः- आत्मा हा स्वभावतःच पवित्र, पूर्ण, अनंत आणि सच्चिदानंदरूप आहे असें पौरस्त्य तत्त्वज्ञांचे मत आहे. शाक्त, शैव, सौर, वैष्णव इत्यादि अनेक भेद आमच्यांत असले, तरी या मूल सिद्धांताबद्दल त्यांत मतभेद नाही. त्याच प्रमाणे बौद्ध, जैन वगैरे दुसरे पौरस्त्य धर्महि याच मताचा अनुवाद करितात. द्वैत आणि अद्वैत या मतांतील भेदहि या बाबतीत फार थोडा आहे. पूर्व दुष्कर्मानुसार पवित्र आत्मा अपवित्र झाला आहे आणि परमेश्वराच्या कृपेनें तो पुनः पवित्र होईल असें द्वैतवादी म्हणतात. उलट पक्षी आत्मा अपवित्र झाला आहे ही गोष्टही खोटी असून ती आभासरूप आहे असे अद्वैती म्हणतात. मायेचें आवरण आपणांवर असल्यामुळे आत्मा विकृत झाल्याचा भास आप णांस होतो. वस्तुतः त्याचे सच्चिदानंदरूप बाधित झाले नसतांहि तें तसें झाले आहेसे भासणे हीच माया. दोन मतांतील हा फरक अशा प्रकारचा आहे; तथापि मूल मुद्द्यासंबंधी दोहोंची एकवाक्यता आहे. पाश्चात्य विचार सरणीची गोष्ट याहून भिन्न आहे. त्यांच्या विचारसरणींत आणि आमच्या तत्त्व- -